आकाशात उडणाऱ्या ‘एलियन’ची पोलिसांनी ‘हवा’ काढली, लोकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण

उत्तर प्रदेशातील एका गावात आकाशात उडणाऱ्या एलियन सदृश्य वस्तूमुळे भीतीचे वातावरण पसरले. लोकांची पळापळ सुरू झाली. काहींनी थेट पोलिसांना फोन करून याची माहिती दिली. आकाशात एलियन उडत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी देखील लवाजम्यासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र आकाशात उडणारी ती वस्तू एलियन नाही तर ‘आयर्न मॅन’च्या आकारातील एक गॅसचा फुगा असल्याचे स्पष्ट झाल्याने चर्चेला पूर्णविराम मिळाला.

‘पीटीआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडा भागात आकाशात शनिवारी सकाळी काहीतरी उडत असल्याचे नागरिकांना दिसले. ‘आयर्न मॅन’च्या आकारातील गॅसचा फुगा पाहून अनेकांना आकाशात एलियन उडत असल्याचा भास झाला. नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

आकाशात उडणारा हा फुगा भट्टा पारसौल गावाजवळ असणाऱ्या एका तलावाजवळ पडला. पोलिसांनी आणि नागरिकांनी तडक तिकडे धाव घेतली. याबाबत बोलताना पोलीस अधिकारी अनिल कुमार पांडे यांनी सांगितले की, नदीतील पाण्यात असणाऱ्या झाडीत अडकलेला हा फुगा वाऱ्याने हलत होता. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. हॉलिवूड चित्रपटातील ‘आयर्न मॅन’च्या आकारातील हा फुगा पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्याची हवा काढली. यामुळे ‘एलियन’ उडत असल्याची चर्चाही बंद झाली.

आपली प्रतिक्रिया द्या