कमलेश तिवारी हत्याकांड; सुरतमधील तिघांसह 5 जणांना अटक

290

उत्तर प्रदेशातील हिंदु समाज पक्षाचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांच्या हत्याकांडप्रकरणी आतापर्यंत सुरतमधील तिघांसह पाच जणांना अटक केली आहे. या हत्याकांडामागे दहशतवादी कट आहे का याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, तिवारी यांच्या कुटुंबीयांनी

‘एनआयए’ चौकशीची मागणी केली आहे.

लखनौतील खुर्शिदबाग परिसरात कमलेश तिवारी यांची गोळ्या घालून शुक्रवारी हत्या करण्यात आली. हल्लेखोर मिठाईचा बॉक्स घेऊन आले हेते. कमलेश तिवारी घरातीलच आपल्या कार्यालयात बसले होते. कमलेश तिवारींबरोबर हल्लेखोरांनी चहा घेतला. त्यानंतर गळा दाबून आणि गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली.

सुरतमध्ये शिजला कट

उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक ओ. पी. सिंह यांनी सांगितले की, तिवारी यांच्या हत्येचा कट गुजरातमधील सुरतमध्ये शिजल्याची माहिती मिळाली आहे. मिठाईच्या बॉक्सवर सुरतचा पत्ता आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास करून आरोपींची माहिती तातडीने गुजरात ‘एटीएस’ला दिला. सुरतमधून फैझान युनूसभाई, मौलाना मोहसिन शेख आणि राशीद अहमद पठाण या तिघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या. उत्तर प्रदेश पोलिसांनी बिजनौर येथून मोहमद मुफ्ती नईम काझी आणि इमाम मौलाना अन्वरूल हक या दोघांना अटक केली आहे.

लेखी आश्वासनानंतर अंत्यसंस्कार

जोपर्यंत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भेट देत नाहीत तोपर्यंत कमलेश तिवारी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका त्यांच्या कुटुंबाने आणि हिंदू समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतली होती. अखेर मुख्यमंत्र्यांनी दोषींवर कठोर कारवाईचे लेखी आश्वासन प्रशासनामार्फत दिल्यानंतर तिवारी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तिवारी यांच्या कुटुंबाची लवकरच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भेट घेणार आहेत, अशी माहिती लखनौचे आयुक्त मुकेश मेश्राम यांनी दिले. या हत्याकांडाची राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत (एनआयए) चौकशी करण्याची मागणी तिवारी यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या