
दिवसभर घाम गाळून दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असणाऱ्या एका मजुराला आयकर विभागाने 7 कोटी रुपयांची नोटीस धाडली आहे. उत्तर प्रदेशमधील हरदोई येथे हा धक्कादायक प्रकार समोर आला असून आयकर विभागाची नोटीस मिळाल्यापासून मजुराचे कुटुंब मानसिक तणावाखाली आहे. घरात फुटकी कवडी नसताना, दोन वेळच्या जेवणारी भ्रांत असणाऱ्या आणि झोपडीवजा घरात राहणाऱ्या कुटुंबाला आयकर विभागाची कोट्यवधींची नोटीस आल्याने खळबळ उडाली आहे.
हरदोई जिल्ह्यातील माधौजंग पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या रुदामऊ गावात राहणाऱ्या गोविंदला आयकर विभागाने 7 कोटींची नोटीस धाडली आहे. गोविंद मजुरीचे काम करतो आणि दिवसभर मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. मात्र आयकर विभागाचे पथक 7 कोटी 15 लाख 92 हजार 786 रुपयांची नोटीस घेऊन त्यांच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.
एकीकडे घरात दोन वेळच्या जेवणारी भ्रांत आणि दुसरीकडे कोट्यवधी रुपयांची आयकर नोटीस पाहून गोविंदच्या कुटुंबाला मानसिक धक्का बसला आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने नोटीस पाहून गोविंदच्या घरात चिंतेचे वातावरण आहे. कुटुंबातील सदस्यांची झोप उडाली असून भीतीपोटी अनेक दिवसांपासून घरात चूलही पेटलेली नाही. गोविंदची पत्नी सोनी देवी आणि त्यांचे वृद्ध आई-वडील यांनाही अश्रू अनावर झाले आहेत. 7 कोटी रुपये भरायचे कुठून हा प्रश्न गोविंदच्या कुटुंबाला सतावत आहे.
गोविंदची फसवणूक कशी झाली?
गोविंदला कोट्यवधी रुपयांची आयकर नोटीस कशी आली यामागील कारणही आता समोर आले आहे. 6 वर्षांपूर्वी गोविंद कामाच्या शोधात कानपूरला गेला होता. तिथे एका महिलेने त्याला सरकारी मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून सीतापूरमधील बिसवा येथे नेले. तेथील एचडीएफसी बँकेत त्याचे खाते उघडण्यात आले. या बदल्यात गोविंदला 2 ते 3 हजार रुपये देण्यात आले. गोविंदने बँकेचे पासबूक आणि चेकबूक संबंधितांकडे सोपवले होते. त्यानंतर तो ही गोष्ट विसरून गेला. गोविंदच्या साध्याभोळ्या स्वभावाचा फायदा फसवणूक करणाऱ्या टोळीने उठवला. या टोळीने गोविंदच्या नावावर एक बनावट फर्म तयार केली आणि त्या खात्यातून कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार केले.
घरची परिस्थिती बेताची
दरम्यान, गोविंद स्वत: मजुरी करून घरचा उदरनिर्वाह चालवतो. त्याचा मोठा भाऊ हातगाडी चालवतो तर धाकटा भाऊही मजुरी करतो. अत्यंत गरीब कुटुंबाला बळीचा बकरा बनवण्यात आल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसत असून या कुटुंबाने आता प्रशासनाकडे न्यायाची मागणी केली आहे.





























































