अशी सासू मिळूदे सर्वांना…आईने नाकारले पण सासूने दिले जीवदान

सासू-सूनेचे नाते म्हटले की रुसवे फुगवे, टोमणे आलेच. त्यात सासू-सून म्हणजे छत्तीसचा आकडा असाच समज आहे. मात्र उत्तर प्रदेशात एका सासू-सूनेचे चक्क छत्तीस गुण जुळल्याचे समोर आले आहेत. येथील एटा जिल्ह्यातील अश्विनी प्रताप सिंह यांच्या आई बीनम देवी आपल्या सूनेला जीवदान देण्यासाठी चक्क एक किडणी दान केली आहे. त्यांच्या या कृत्याचे गावातील लोकांनी फुलांची उधळण करत घराघरात मिठाई वाटून त्यांचे स्वागत केले आहे.

फारुखाबाद येथे राहणाऱ्या पूजा यांचा विवाह नोव्हेंबर 2023 मध्ये एटा निवासी अश्विनी प्रताप सिंह यांच्याशी झाला होता. फेब्रुवारी 2024मध्ये त्या गरोदर असताना त्यांच्या पोटात संसर्ग झाला. हा संसर्ग एवढा वाढला की, तिच्या दोन्ही किडण्या 75 टक्के निकामी झाल्या. तिला वाचविण्यासाठी कुटुंबांनी अनेक रुग्णालयाच्या पायऱ्या झिजवल्या मात्र काहीच फायदा झाला नाही. अखेर पूजाला लखनऊच्या डॉ.राम मनोहर लोहिया रुग्णालयात नेण्यास सांगितले. त्यावेळी डॉक्टरांनी तिला वाचविण्यासाठी किडणी प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय असल्याचे सांगितले. त्यासाठी सगळीकडे प्रयत्न केले मात्र काहीच उपयोग झाला नाही. अखेर सासूने मी माझ्या सूनेला किडणी देईन असे सांगितले. सुदैवाने तिचा रक्तगट जुळला आणि कोणतेही किंतुपरंतु मनात न बाळगता 13 सप्टेंबरला आपल्या सुनेला किडणी दान केली.

सूनेवर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर पूजा भावूक झाली. म्हणाली माझ्या आईने मला किडणी देण्यासाठी नकार दिला, मात्र माझ्या सासूने कसलाही विचार न करता माझा जीव वाचवला. फक्त तिच्यामुळे आज मी माझ्य़ा मुलीला कुशीत घेऊन झोपवू शकले आहे. देव सर्वांना अशी सासू देवो अशा भावना व्यक्त केल्या. महिन्याभरानंतर जेव्हा सासू-सून गावात परतल्या त्यावेळी संपूर्ण गाव भावूक झाले. ग्रामस्थांनी या सासू-सूनेचे फुलांची उधळण करुन स्वागत करुन घराघरात मिठाया वाटल्या.,