पंजाब, उत्तर प्रदेशात मंत्रिमंडळ विस्तार, चन्नी सरकारमध्ये 15 मंत्री, 6 नवे चेहरे

पंजाबच्या काँग्रेस सरकारचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून रविवारी 5 नवीन मंत्र्यांना चंदिगडमध्ये शपथ देण्यात आली. चन्नी यांच्या मंत्रिमंडळात एकूण 15 मंत्री असून त्यात 6 नवे चेहरे आहेत, तर माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या सरकारमधील 9 मंत्र्यांना मंत्रिमंडळात पुन्हा स्थान दिले आहे.

पुढील वर्षी होणाऱया निवडणुका व पक्षांतर्गत घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंजाब काँग्रेसने राज्याचे नवीन मंत्रिमंडळ तयार केल्याचे स्पष्ट झाले आहे. नव्या चन्नी सरकारच्या मंत्रिमंडळात ब्रह्म मोहिंद्रा, मनप्रीत सिंग बादल, त्रिप्त राजिंदर सिंग बाजवा, सुखबिंदर सिंग सरकारिया, राणा गुरजीत सिंग, अरुणा चौधरी, रझिया सुलताना, भारत भूषण अशू, विजय इंदर सिंगला, रणदीप सिंग नाभा, राद कुमार वेर्का, संकत सिंग गिलझियान, परगत सिंग, अमरिंदर सिंग राजा वारिंग, गुरकिरत सिंग कोटिल यांचा समावेश आहे. रविवारी ज्या मंत्र्यांना शपथ दिली त्यात राणा गुरजीत सिंग यांचेही नाव आहे. त्यांच्या नावाला काँग्रेसच्या काही आमदारांचा विरोध आहे.

योगी सरकारचे जातीय समीकरण; 3 ओबीसी,3 दलितांना संधी

उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक पुढील वर्षी होणार आहे. त्याअनुषंगाने जातीय समीकरणाच्या आधारे राजकीय गणिते बांधत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंत्रिमंडळ विस्तार केला आहे. मंत्रिमंडळात 3 ओबीसी आणि 3 दलित मंत्र्यांना संधी दिली आहे, तर एका ब्राह्मण नेत्याला मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. रविवारी या सातही नव्या मंत्र्यांना राजभवनमध्ये राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी शपथ दिली.

जितीन प्रसाद, पलटू राम, धर्मवीर प्रजापती, छत्रपाल गंगवार, संगीता बलवंत, संजीवकुमार गोंड आणि दिनेश खटिक अशी योगी सरकारमधील नव्या मंत्र्यांची नावे आहेत. यापैकी जितीन प्रसाद यांना कॅबिनेट, तर इतरांना राज्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या