‘मला गोळी मारू नका’, गळ्यात पाटी टांगून काढली धिंड 

861


आजवर आपण अनेक नेत्यांचे रोड शो आणि धार्मिक मिरवणुका पाहिल्या असतील. मात्र तुम्ही कधी कोणत्या दरोडेखोराचा रोड शो पाहिला आहे का? उत्तर प्रदेशमधील अमरोहा जिल्ह्यात पोलिसांनी 15 लाखांची लूट करणाऱ्या एका दरोडेखोराला जेरबंद करण्याऐवजी त्याच्या गळ्यात पाटी टांगून धिंड काढली आहे. या पाटीवर ‘मला गोळी मारू नका, मी दरोडेखोर आहे.’ असं लिहिण्यात आलं आहे.

हा प्रकार पाहून अनेक लोक आश्चर्यचकित झाले आहेत. गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी हा ‘रोड शो’ काढण्यात आला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांनी या आरोपीला जेरबंद करून न्यायालयात हजर करण्याऐवजी त्याची रस्त्यावर धिंड काढून कायदा हातात घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अखिलने आपल्या साथीदारांसह 23 जुलै रोजी अमरोहातील गजरौला येथील व्यापारी राजेंद्र अग्रवाल यांच्याकडून 15 लाख रुपये लुटले होते. याप्रकरणी अग्रवाल यांनी पोलिसात तक्रार नोंदवली होती. पोलीस आरोपीचा शोध घेत असताना सोमवारी अखिल लुटलेल्या रकमेतील 2 लाख आणि चोरीच्या कारसह पोलिसांच्या हाती लागला. मात्र पोलिसांनी आरोपीला अटक केली नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून पोलीस या आरोपीचा शोध घेत होते. या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी 15 हजारांचे बक्षिस ठेवले होते. पोलीस अधीक्षक अजय प्रताप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपीने आत्मसमर्पण केले. तसेच या गुन्ह्यातील चार आरोपींना पोलिसांनी आधीच अटक केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या