उत्तर प्रदेश- परराज्यातून घरी परतणाऱ्यांच्या गाडीला अपघात, सात जण ठार

692

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर अनेक राज्यांत कामासाठी गेलेले मजूर तिथेच अडकून पडले होते. मात्र, केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या सूचनेनुसार त्यांना परत आपल्या गावी पाठवण्यात येत आहे. अशाच प्रकारे उत्तर प्रदेशातून मध्य प्रदेशात परतणाऱ्या मजुरांच्या गाडीला अपघात झाला असून त्यात सात जण मृत्युमुखी पडले आहेत.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, मध्य प्रदेशातील छतरपूर इथले हे रहिवासी होते. उत्तर प्रदेशात कामानिमित्त गेल्यानंतर लॉकडाऊनची घोषणा झाल्याने ते तिथेच अडकून पडले होते. परवानगी मिळाल्यानंतर मध्यप्रदेशात आपल्या गावी परतण्यासाठी हे सर्व प्रवासी टेम्पोतून प्रवास करत होते. मथुरा येथे त्यांच्या टेम्पोला दुसऱ्या गाडीची जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात सात जण जागीच ठार झाले. तर अनेक जण जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं वृत्त आहे.

अशा प्रकारे घडलेल्या अपघाताची ही पहिली घटना नसून यापूर्वी ओदिशात फसलेल्या तेलंगणा राज्यातील मजुरांच्या बसला असाच अपघात झाला होता. त्यात बसचालकाचा मृत्यू झाला तर अन्य दोन जण जखमी झाले होते. 3 मे रोजी गुजरातच्या सूरत शहरातून प्रवासी मजुरांना घेऊन जाणाऱ्या बसला ओदिशातील गंजाम आणि कंधमाल या जिल्ह्यांच्या सीमेवर अपघात झाला. यात पाच जण जखमी झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या