Uttarakhand Train Accident – चमोलीमध्ये बोगद्यात दोन लोको ट्रेनची समोरासमोर धडक, 60 जण जखमी

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील अलकनंदा नदीवर सुरू असलेल्या ‘टिहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’च्या (THDC) विष्णुगाड-पीपलकोटी जलविद्युत प्रकल्पाच्या ठिकाणी मंगळवारी रात्री एक भीषण अपघात झाला. बोगद्यात कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या दोन लोको ट्रेनची समोरासमोर धडक झाली. या अपघातात 60 हून अधिक कामगार जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात मंगळवारी रात्री साडे नऊच्या सुमारास झाला. या प्रकल्पासाठी ‘HCC’ कंपनी पीपलकोटीच्या हाट गावापासून हेलंगपर्यंत 13.5 किमी लांबीचा बोगदा तयार करत आहे. रात्रीची शिफ्ट संपवून 110 कर्मचारी आणि इंजिनिअर्स लोको ट्रेनने बाहेर येत होते. त्याच वेळी लोखंडी रुळावरून सामान घेऊन जाणारी दुसरी लोको ट्रेन समोरून आली. सामान घेऊन येणाऱ्या लोको ट्रेनचे ब्रेक फेल झाल्याने ती कामगारांच्या ट्रेनवर जोरदार धडकली. यानंतर दोन्ही ट्रेन पलटी झाल्या.

अपघातानंतर बोगद्यात एकच खळबळ उडाली. इतर कर्मचाऱ्यांनी तातडीने जखमींना बाहेर काढले आणि रुग्णवाहिकेला पाचारण केले. गोपेश्वर येथील जिल्हा रुग्णालयात 42 जखमींवर उपचार सुरू असून पीपलकोटी येथील विवेकानंद रुग्णालयात 17 जखमी उपचार घेत आहेत. किरकोळ जखमी झालेल्यांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. जखमींमध्ये प्रामुख्याने बिहार, ओडिशा आणि झारखंड राज्यातील कामगारांचा समावेश आहे.

घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी गौरव कुमार आणि पोलीस अधीक्षक सुरजीत सिंह पंवार यांनी रात्रीच रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. एकाच ट्रॅकवर दोन लोको ट्रेन चालवणे ही गंभीर निष्काळजीपणाची बाब आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे,” असे प्रकल्पाचे व्यवस्थापक विनोद सिंह यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, हा 448 मेगावॅटचा प्रकल्प गेल्या 10 वर्षांपासून निर्माणाधीन आहे. यामध्ये जवळपास 2 हजार कर्मचारी रात्रंदिवस काम करत असतात. या अपघातामुळे प्रकल्पातील सुरक्षिततेच्या नियमांवर आता मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. अपघातामुळे बोगद्यातील बांधकामाचे कामही थांबवण्यात आले.