जे काही घडले त्याबद्दल वाईट वाटतेय; पण तुम्ही कोणत्या देशाचे आहात, तुमचा देश किती मोठा आहे याचा काहीही संबंध नाही. खेळाडू हे खेळाडू असतात. एखाद्या खेळाडूचे वजन जास्त असेल हे दिसत असतानाही त्याला स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी कशी देणार? नियमांचे पालन करण्यापलीकडे आमच्याकडे काही पर्याय नव्हता. असे वक्तव्य हिंदुस्थानची कुस्तीपटू विनेश फोगाट अपात्रता प्रकरणी युनायटेड वर्ल्ड रेसलिंगचे प्रमुख नेनाद लालोविक यांनी केले आहे. त्यामुळे विनेश फोगाटला रौप्य पदक मिळणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रीडा लवाद आता विनेश फोगाट प्रकरणी उद्या निकाल देणार आहे. अवघ्या जगाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. फोगाटला अतिरिक्त वजनामुळे 50 किलो वजनी गटाच्या फ्रीस्टाईल कुस्तीच्या सुवर्णपदक स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आले. याच निर्णयाला विनेशने पॅरिस ऑलम्पिकमध्ये युस्नेलिस गुझमन लोपेझसह संयुक्त रौप्य पदक देण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे अपील केले आहे. त्यामुळे विनेशला रौप्यपदक मिळण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. अशातच युनायटेड वर्ल्ड रेसलिंगचे प्रमुख नेनाद लालोविक यांनी आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाच्या निकालातही फारसा बदल नसेल; कारण कुस्ती मंडळ केवळ घालून दिलेल्या नियमांचे पालन करत होते, असे म्हटले आहे.
आम्ही नियम बदलत नाही
आम्ही खेळाडूंचा विचार करतच हा नियम आणला आहे. स्पर्धेसाठी खेळाडूंना वजनाच्या नियमांचे बंधन घालण्यात आले आहे. पुढे कदाचित नियमांमध्ये काही फेरबदल करता येतील, पण आम्ही नियम बदलत नाही आहोत. आमच्या वैद्यकीय आयोगाद्वारे आम्हाला सल्ला दिला जातो. ते कोणत्याही बदलाच्या पूर्णपणे विरोधात आहे, असेही नेनाद लालोविक यांनी नमूद केले आहे.