संरक्षक वैज्ञानिक

>> शैलेश माळोदे

डॉ. व्ही. एस. अरुणाचलम… संरक्षण मंत्रालयात अनेक प्रयोग करून देशी आयुध तयार करणारा एक अलौकिक शास्त्रज्ञ….

आपल्या दहा वर्षांच्या कारकीर्दीत डॉ. व्ही. एस. अरुणाचलम यांचा लौकिक वन मॅन आर्मी ऑफ डीआरडीओ होता. त्यांना सैन्य दलाच्या आस्थापनाचा आणि संरक्षण मंत्रालयातील नोकरशाहीचा मुकाबला करत स्वदेशातच आपल्यासाठी उपयुक्त आयुधं तयार करून ‘देसी वॉर मशीन’ सुधारायला हवी असा आग्रहच धरला नाही तर कृतीसुद्धा केली. त्यांच्या कारकीर्दीत डीआरडीओचं बजेट 100 कोटींवरून 800 कोटींवर पोहचलं. प्रयोगशाळांची संख्या 36 वरून 49 झाली, अनेक प्रकल्प सुरू झाले, ’संरक्षण मंत्र्यांचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार, डीआरडीओंचं महासंचालक आणि केंद्र संरक्षण उत्पादन आणि संशोधन खात्याचे सचिव म्हणून दहा संरक्षणमंत्री आणि पाच पंतप्रधानांबरोबर कार्य केलेल्या डॉ. व्ही. एस. अरुणाचलम यांचे सध्याचं वय 84 वर्षे असून ते सीएसटीईपी या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील थिंक टँकचे संस्थापक अध्यक्ष असून बंगळुरू येथे स्थायिक आहेत. विज्ञानात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या डॉ. अरुणाचलम यांनी पदार्थ विज्ञान आणि अभियांत्रिकमध्ये वेल्स विद्यापीठ येथून डॉक्टरेट संपादन केली.

शांतीस्वरूप भटनागर पारितोषिकासहित अनेक पारितोषिके आणि पुरस्कारांनी अलंकृत डॉ. अरुणाचलम रॉयल ऍकॅडमी ऑफ इंजिनीअरिंगसाठी निवडल्या गेलेले प्रथम हिंदुस्थानी फेलो आहेत. पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करून भारत सरकारने त्यांचा गौरव केला होता. त्यांना डीआरडीओनं त्यांना वैज्ञानिक संशोधन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील लक्षणीय कामगिरीसाठी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून गौरविलं. सध्या ते वॉर्विक विद्यापीठात मानद प्राध्यापक आणि कार्नेजी मेलन विद्यापीठात सहकार्यिक प्राध्यापक म्हणूनही कार्यरत आहेत.

प्रा. व्ही. एस. अरुणाचलम यांनी वैज्ञानिक म्हणून भाभा अणुसंशोधन केंद्र, राष्ट्रीय एरॉनॉटिकल प्रयोगशाळा, बंगळुरू आणि संरक्षण धातू शास्त्रीय संशोधन प्रयोगशाळा हैदराबाद या ठिकाणी कार्य केलंय. ‘‘लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट आणि इंटिग्रेटेड गायडेड मिसाईल कार्यक्रम यासारखे कार्यक्रम मी सुरू केल्याचं’’ सांगत प्रा. अरुणाचलम यांनी आपल्या कारकीर्दीत आढावा घेतला तो असा, ‘‘मी सरकारला अनेक महत्त्वाच्या तंत्रज्ञानात्मक आणि समाजोपयोगी कार्यक्रमांच्या व्याख्येसहित पडताळणी आणि परीक्षणाबाबत सल्ला दिलाय. देशासाठी ऑप्टिकल फायबर संदेशवहनासहित विविध प्रकारच्या लोह आणि पोलाद तंत्रज्ञानांचा विकास आणि देशातील अशिक्षितता तसंचे अर्भकांची अपमृत्यू टाळण्यासाठीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मोहिमांच्या विकसनांचाही समावेश आहे. त्याचबरोबर देशातील पदवीस्तरावरील अभियांत्रिकी शिक्षण कसं असावं याबाबतदेखील मी सरकारला वेळोवेळी सल्ला दिलेला आहे.’’

डॉ. अरुणाचलम यांनी डीआरडीओच्या प्रमुखपदाचा राजीनामा अचानक देऊन कार्नेजी मेलन विद्यापीठात दोन वर्षांच्या कालावधीसाठी सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेतल्यावर देशभर धुरळा उठला. त्यांच्या जागी 61 वर्षीय डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची नियुक्ती करण्यात आली. डॉ. व्ही. एस. अरुणाचलम यांनी देशाच्या सुरक्षाविषयक गुपितांविषयक काळजी घेतली नसल्याचं त्यावेळी म्हटलं गेलं. त्यावर त्यांची प्रतिक्रिया अत्यंत कडवट आहे/होती. ‘‘तुम्हाला मी देशात असताना गुपितांविषयी चिंता नाही, मात्र परदेशात नाही? मी संवेदनशील पदावर काम केल्यामुळे माझी हत्या करायला हवी का? प्रा. सतीश धवन आणि डॉ. वसंत गोवारीकर यांनीदेखील असंच परदेशी काम केलंय मग मलाच का लक्ष्य करण्यात आलं.’’ डॉ. कलाम यांना अरुणाचलम यांच्याप्रमाणे नोकरशाही आणि वित्तीय अडथळे पार करण्यात अडचणी येऊन फारसे यश लाभलं नसावं. कारण अरुणाचलम बाहेर पडल्याबरोबर तत्कालीन संरक्षणमंत्री शरद पवार यांनी पुढील पाच वर्षांसाठीच्या डीआरडीओ बजेटमध्ये 75 टक्क्यांची कपात केली. ‘‘सौम्य व्यक्तिमत्त्वाचे असले तरी कलाम यांच्याकडे जबरदस्त लढाऊ वृत्ती आणि तंत्रज्ञान व्यवस्थापन क्षमता होती.’’ असे डॉ. अरुणाचलम म्हणतात. मात्र त्या वेळी अनेकांना डीआरडीओच्या भविष्यावरील प्रश्नचिन्ह ठळकपणे जाणवलं. अर्थात नंतरचा इतिहास काहीसा वेगळा आहे.

डीआरडीओतर्फे ‘फ्रॉम टेम्पल्स टू टर्बाईन – ऍ?? ऍडव्हेंचर इन टू वर्ल्डस’ हे पुस्तक गेल्या वर्षी प्रकाशित करण्यात आलं असून डॉ. व्ही. एस. अरुणाचलम त्याचे लेखक आहेत. अवघ्या 47 व्या वर्षी ते देशाच्या संरक्षण संशोधन क्षेत्रातील सर्वोच्चपदी पोहचलेले डॉ. अरुणाचलम अजूनही कार्यक्षम असून विज्ञान-तंत्रज्ञानविषयक सल्लागार म्हणून विविध परिषदांतून महत्त्वपूर्ण विषयांवर व्याख्याने देण्याबरोबरच विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून मार्गदर्शकाची भूमिका इमानेइतबारे बजावत असतात. वादग्रस्त ठरलेलं हे व्यक्तिमत्त्व अत्यंत बुद्धिमान म्हणून सर्वांना प्रभावीत करत असतं.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या