
दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका मुलीवर हल्लेखोराने वर्गात शिरून चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास वडगाव शेरी परिसरात घडली आहे. हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दहावीचा निरोप समारंभ सुरू असताना हल्लेखोराने शिक्षकांसह इतर विद्यार्थ्यांसमोरच मुलीवर जीवघेणा हल्ला केल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे पालकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
वडगाव शेरीतील लेडी ताहेरूनिसा इनामदार शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम सुरू होता. त्यावेळी हल्लेखोर हातात चाकू घेऊन वर्गामध्ये शिरला. त्याने थेट विद्यार्थिनीवर वार करून गंभीररित्या जखमी केले. विद्यार्थ्यांसह शिक्षिकेच्या समोरच मुलीवर सपासप वार केले. त्यामुळे मोठी घबराट पसरली.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विद्यार्थिनीला पालकांच्या मदतीने तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पालकही मोठ्या संख्येने जमले आहेत. एकतर्फी प्रेमातून हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.



























































