वाढवण बंदर भूमिपूजनाच्या सोहळ्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पालघरमध्ये येणार आहेत. या प्रकल्पाच्या विरोधात स्थानिकांनी आवाज उचलला असताना देखील प्रकल्प तेथे लादला जात आहे अशी स्थानिकांची भूमिका आहे. या निषेधार्थ धाकटी डहाणू गावातील (पालघर) येथील मच्छीमार बांधवांनी काळे झेंडे, काळे फुगे बोटीवर लावून रॅली काढली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात ‘गो बॅक’चा नारा दिला.
दरम्यान, पालघरमधील स्थानिकांमध्ये अनेक चर्चा रंगल्याचंही पाहायला मिळालं. उद्घाटन जर वाढवण येथे होणार नाही, मग दिल्ली मधूनही ऑनलाईन उद्घाटन करता येऊ शकतं. असं असतानाही जेएनपीटीचा हट्ट पुरवण्यासाठी पंतप्रधान पालघरला येणार असं बोललं जात आहे. यामुळे 50 कोटीचा खर्च वाया जाणार आहे. हा पैशांचा चुरडा कशासाठी? असा संतप्त सवाल स्थानिक विचारत आहेत.
वाढवण बंदर भूमिपूजनाच्या निषेधार्थ धाकटी डहाणू गावातील मच्छीमार बांधवांनी काळे झेंडे, काळे फुगे बोटीवर लावून रॅली काढली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात ‘गो बॅक’चा नारा दिला. pic.twitter.com/QoQuMbFrFD
— Saamana (@SaamanaOnline) August 30, 2024
पंतप्रधान मोदींच्या भेटीमुळे महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन हैराण झालं आहे. पंतप्रधान येणार म्हणून मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा आहे. अनेक रस्ते वाहतुकीसाठी काही काळ बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामध्ये नागरिकांसह पोलीस प्रशासन हैराण झालं आहे.