
तुम्हाला एखाद्या गोष्टीची आवड असेल तर सवड ही मिळतेच. गेली अनेक वर्षे पंचतारांकित हॉटेलात शेफ म्हणून काम करणाऱया नेरळच्या वैभव भुंडेरे या तरुणाने नोकरी सांभाळून आपल्या कलेची आवड जपली आहे. कलिंगड आणि पिंपळाचे पान कोरून त्याने कलाकृती साकारल्या आहेत. त्याच्या या अनोख्या कलाकृतींचे फोटो सोशल मीडियावरही गाजत आहेत.
नेरळमधील पोशीर येथे राहणाऱया वैभवला लहानपणापासूनच खाद्यपदार्थ बनवण्यासोबत चित्रकलेची आवड. पुढे व्यवसाय म्हणून त्याने शेफची नोकरी पत्करली. मात्र कलेची साथ सोडली नाही. इंटर्नशिपमध्ये असताना एका शेफकडून त्याने फ्रूट कार्व्हिंगचे धडे घेतले.
आतापर्यंत त्याने कलिंगड कोरून त्यापासून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, महानायक अमिताभ बच्चन, सुपरस्टार रजनीकांत, युवराज सिंग अशा अनेक दिग्गजांच्या 40 ते 50 कलाकृती साकारल्या आहेत. नुकतीच महाशिवरात्रीनिमित्त त्याने कलिंगडावर भगवान शंकराची मूर्ती साकारली होती. लॉकडाऊनमध्ये कलिंगड सहज उपलब्ध होत नसल्याने त्याने पिंपळाच्या पानापासून कलाकृती तयार केल्या आहेत. पिंपळाचे पान कोरून त्यापासून छत्रपती शिवाजी महाराज, विठ्ठल, भगवान शंकर, शहीद भगतसिंग अशा अनेक कलाकृती बनवल्या आहेत.
कलिंगडावरील कलाकृतीसाठी अर्धा तास, तर पिंपळाच्या पानावरील कलाकृतीसाठी 15 ते 20 मिनिटे लागतात. यूटय़ूब आणि फेसबुकवर कलाकृतींचे फोटो शेअर केल्यानंतर लोक माझ्या कलेचे कौतुक करतात. काहीजण पिंपळाच्या पानावर स्वतःचे फोटो बनवून घेतात. सोशल मीडियामुळे माझी कला सर्वत्र पोहोचत आहे.
– वैभव भुंडेरे, कलाकार


























































