
एकीकडे शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी भाजपवर मतदारांना पैसे वाटल्याचे आरोप केले, परंतु निलेश राणे आणि शिंदे गटही धुतल्या तांदळासारखी नाही. दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे मालवणात आले तेव्हा त्यांच्या मागून त्यांचे बॉडीगार्ड पैशाच्या बॅगा घेऊन कॅमेऱ्यापासून लपण्यासाठी धावत होते, असा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. याचा व्हिडीओही त्यांनी आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे.
एकनाथ शिंदे यांनी आणलेले पैसे काल निलेश राणे यांनी मालवण मधील मतदारांना वाटले आहेत. राज्यात सत्तेत राहून जनतेच्या पैशात भ्रष्टाचार करून मिळविलेला हा पैसा आहे. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हेच धोरण सध्या शिंदे गटाकडून प्रत्येक निवडणुकीत राबविले जात आहे, असा आरोप वैभव नाईक यांनी केला आहे. हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी मालवणच्या जनतेने विचारपूर्वक मतदान करावे असे आवाहनही त्यांनी केले.
एकनाथ शिंदेंनी मालवणात आणल्या पैशांच्या बॅगा; निलेश राणेंकडूनही पैशांचे वाटप, वैभव नाईक यांनी शेअर केला व्हिडीओ pic.twitter.com/lYHoKg60N1
— Saamana Online (@SaamanaOnline) December 2, 2025
निलेश राणेंनी पकडली पैशाने भरलेली गाडी
दरम्यान, भाजप कार्यकर्त्याच्या घरावर धाड टाकत पैशाची बॅग पकडणारे शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी सोमवारी मध्यरात्रीही भाजपची एक पैशाने भरलेली गाडी पकडली आणि थेट पोलीस स्थानक गाठले. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतल्याने पोलिसांनी भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले.
भाजपकडून मालवणमध्ये निवडणुकीत पैशाचे वाटप, शिंदे गटाच्या निलेश राणेंचा आरोप































































