सत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज नवी दिल्ली येथे करण्यात आली. मल्याळम भाषेतील ‘अट्टम’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय सन्मान मिळाला. परेश मोकाशी दिग्दर्शित ‘वाळवी’ हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे. ‘कांतारा’साठी ऋषभ शेट्टी सर्वोत्कृष्ट अभिनेता तर ‘थिरुचित्रंबलम’ आणि ‘कच्छ एक्प्रेस’साठी अनुक्रमे नित्या मेनन, मानसी पारेख सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरल्या.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कार घोषित केले. फीचर फिल्म श्रेणीत ‘उंचाई’ चित्रपटासाठी सूरज बडजात्या सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरले. मनोरंजनपर चित्रपट म्हणून ‘कांतारा’ला तर सर्वोत्कृष्ट ऑनिमेशन आणि व्हीएफएक्ससाठी ‘ब्रह्मास्त्र भाग-1’ला गौरविण्यात येणार आहे. ‘आइना’ हा सर्वोत्कृष्ट कथाबाह्य चित्रपट ठरला. पवन राज मल्होत्रा आणि नीना गुप्ता सर्वोत्कृष्ट सहाय्यक कलाकार ठरले. सर्वोत्तम कला-संस्कृती चित्रपट पुरस्कार सुनील पुराणिक निर्मित व दिग्दर्शित ‘रंग विभोग’ या मंदिर नृत्य परंपरा दर्शवणाऱया कन्नड आणि सचिन सूर्यवंशी निर्मित व दिग्दर्शित‘वारसा’ या मराठी पटांना विभागून जाहीर झाला. चित्रपटावरील सर्वोत्कृष्ट पुस्तक म्हणून ‘किशोर कुमार ः द अल्टीमेट बायोग्राफी’ला पुरस्कार देण्यात येणार आहे.
…आणि विजेते आहेत
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ः गुलमोहर, स्पेशन मेन्शन ः गुलमोहर, कधीकन, सर्वोत्कृष्ट बाल कलाकार ः श्रीपथ (मलिकापुरम), सर्वोत्कृष्ट अॅक्शनप ः केजीएफ 2, सर्वोत्कृष्ट संगीत ः प्रीतम ‘ब्रह्मास्त्र भाग-1’, सर्वोत्कृष्ट गीत ः नौशाद खान (फौजा), ए. आर. रेहमान (पीएस 1), सर्वोत्कृष्ट गायक ः अरिजित सिंग (ब्रह्मास्त्र), बॉम्बे जयश्री (सौदी वेलक्का), सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी ः रवी वर्मन (पीएस 1), सर्वेत्कृष्ट साऊंड डिझाईन ः आनंद कृष्णमूर्ती (पीएस 1), सर्वोत्कृष्ट संकलन ः महेश भूवनेंद (अट्टम), सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक ः जानी मास्टर, सतीश कृष्णन (थिरुचित्रंबलम).
मराठी चित्रपटांचा डंका
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत सोहेल वैद्य दिग्दर्शित ‘मर्मर्स ऑफ द जंगल’ या मराठी डॉक्युमेंट्रीने सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री आणि सर्वोत्कृष्ट निवेदक अशा दोन पुरस्कारांवर मोहोर उमटवली. सचिन सूर्यवंशी यांचा ‘वारसा’ सर्वोत्कृष्ट कला आणि संस्कृती चित्रपट ठरला. गिरणगावची कथा आणि व्यथा सांगणाऱया अशोक राणे यांच्या ‘आणखी एक मोहेनजोदारो’ला बेस्ट बायोग्राफिकल, हिस्टोरिकल कम्पायलेशन श्रेणीत पुरस्कार जाहीर झाला.