वंचित आघाडीकडून ईव्हीएमविरोधात 31 याचिका दाखल

20

सामना प्रतिनिधी, मुंबई

राज्यातील बहुतांश लोकसभा मतदारसंघात प्रत्यक्ष झालेले व मोजल्या गेलेल्या मतदानात तफावत आढळल्याने 31 याचिका मुंबईसह नागपूर व संभाजीनगर खंडपीठात दाखल केल्या आहेत. त्याची कोर्टाने लवकरात लवकर सुनावणी घ्यावी तसेच आगामी विधानसभा निवडणूक ईव्हीएम मशिनऐवजी बॅलेट पेपरवर घ्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी केली.

प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी मुंबईतील फोर्ट येथे पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. आंबेडकर म्हणाले, राज्यात नुकतीच लोकसभा निवडणूक झाली. या निवडणुकीत ईव्हीएमद्वारे मतदान झाले. ईव्हीएमद्वारे मतदान घेण्यास देशातील नागरिकांचा व राजकीय पक्षांचा विरोध होता. मात्र, मुंबई हायकोर्टासह सुप्रीम कोर्टाने देशातील नागरिकांना आश्वासित केले होते की, ईव्हीएम मशिन हॅक किंवा टेम्परिंग होऊ शकत नाही. तसेच त्यात कोणत्याही प्रकारची त्रुटी आढळून येत नाही. मात्र, 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात तफावत आढळली. धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. राज्यात सर्व 48 लोकसभा मतदारसंघात जेवढे मतदान झाले आहे त्यात सावळागोंधळ पाहायला मिळाला. याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे माहिती, अहवाल देणे अपेक्षित असते. मात्र, एकाही ठिकाणचा अहवाल दिला नाही, असेही ते म्हणाले.

काँग्रेसला 40 जागा सोडू!
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसबरोबर आघाडी करण्याची आमची तयारी आहे. त्यासाठी आम्ही काँग्रेसला 40 जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे. काँग्रेसला हा प्रस्ताव मान्य नसेल तर वंचित बहुजन आघाडी सर्व 288 जागा लढवेल, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. काँग्रेसची महाराष्ट्रात तेवढीच ताकद उरली असल्याने त्यानुसार आम्ही जागा सोडत आहोत. सध्याचा काँग्रेस पक्ष म्हणजे डोकं नसलेले धड आहे, त्यांमुळे चर्चा तरी कशी आणि कोणाबरोबर करणार, असा टोला त्यांनी लगावला.

आपली प्रतिक्रिया द्या