कोकण मार्गावरून धावणाऱ्या नियमित गाड्यांसह आतापर्यंत जाहीर केलेल्या 278 फेऱ्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल झाले आहे. त्यामुळे बऱ्याच गणेशभक्तांना प्रतीक्षा यादीवरच रहावे लागले आहे. महागड्या तिकिटाच्या वंदे भारत एक्स्प्रेसच्याही गणेशोत्सवातील फेऱ्या हाऊसफुल्ल झाल्याने चाकरमान्यांचा हिरमोड झाला आहे.
कोकण मार्गावरून धावणाऱ्या 8 डब्यांच्या सीएसएमटी-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसला कोकणवासीयांची सर्वाधिक पसंती मिळत आहे. वंदे भारतचे तिकीट महागडे असूनही प्रवाशांचा या एक्प्रेसला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने सर्वच फेऱ्या हाऊसफुल्ल झाल्या आहेत. वंदे भारत एक्स्प्रेसचे आरक्षण काही मिनिटांतच फुल्ल झाल्याने प्रवाशांच्या हाती प्रतीक्षा यादीवरीलच तिकिटे पडत आहेत. वंदे भारत एक्स्प्रेसला अतिरिक्त डबे जोडण्याची मागणीही कोकण विकास समितीसह प्रवासी संघटनांकडून करण्यात येत आहे. महिनाभरात एक्स्प्रेसमधून 30 ते 35 हजार जण प्रवास करत असल्याचे समोर आले आहे. यामुळेच वंदे भारत एक्स्प्रेस 8 डब्यांऐवजी 16 डब्यांची चालवण्याचा आग्रह धरण्यात येत आहे. मात्र रेल्वे बोर्डाने अजूनही सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही.
तीनही ‘गणपती स्पेशल’चे आरक्षण फुल्ल
गणेशोत्सवासाठी रत्नागिरी स्थानकापर्यंत धावणाऱ्या 5 गणपती स्पेशल गाड्यांचे आरक्षण खुले होताच अवघ्या काही मिनिटांतच एलटीटी-रत्नागिरी, रत्नागिरी-पनवेल साप्ताहिक स्पेशलच्या 2 गाड्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल झाले. यामुळे तीनही स्पेशल गाड्यांचे प्रवासी प्रतीक्षा यादीवर आहेत. पाच गणपती स्पेशल गाड्यांच्या 20 फेऱ्या कोकण मार्गावर धावणार आहेत. 01131/01132 एलटीटी-रत्नागिरी, 01142/01141 क्रमांकाची रत्नागिरी-पनवेलसह अन्य एका रत्नागिरी-पनवेलसह 01147/01148 पुणे- रत्नागिरी, 01445/01446 रत्नागिरी-पुणे साप्ताहिक स्पेशलच्या 20 फेऱ्या जाहीर केल्याने साऱ्यांच्या नजरा आरक्षण तारखेकडे खिळल्या होत्या. आरक्षण खुले होताच अवघ्या काही मिनिटांतच 5 पैकी 3 स्पेशल गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले