बोलीभाषेची समृद्धी – अहिराणीचा गोडवा

>> वर्णिका काकडे

आज आपण बोली भाषेत बोलबाला असणाऱया बहिणाबाईंच्या अहिराणी बोलीबाबत जाणून घेऊया. ज्येष्ठ कवयित्री बहिणाबाई यांची अरे ‘खोप्यामंदी खोपा’ ही कविता न ऐकलेला मराठी रसिक विरळच असेल. त्यांच्या कवितांमधून अहिराणी बोलीची गोडी भावणारी आहे. महाराष्ट्राच्या धुळे, जळगाव, नाशिक, बागलाण, नंदुरबार भागात ही भाषा बोलली जाते. खान्देशात आदिवासी, कोकणी, गुजर, बिलोरी या बोलींमध्ये अहिराणी शब्दांचा वापर आढळतो. खान्देशातल्या ‘कानबाई’ उत्सवाला तर अहिराणी गीतांचाच वापर होतो. प्राचीन काळापासून अभिरांच्या म्हणजे अहिरांच्या भूमीत अहिराणी बोलीभाषा रुजत गेली. ही भाषा तिच्या प्रादेशिक नावावरून खानदेशी म्हणूनही ओळखली जाते तर ती मूळ अहिर लोकसमूहाची भाषा असल्याने ती अहिराणी म्हणून ओळखली जाते. अहिराणीची काही वैशिष्टय़े मराठीहून पूर्णपणे भिन्न असून काही बाबतींत ती मराठीशी व काही बाबतींत गुजरातीशी मिळती आहे. या भाषेत उच्चारात मराठीत ज्या ठिकाणी ‘ळ’ असतो, तिथे अहिराणीत ‘य’ आहे. तसेच ‘छ’ व ‘ण’ ही व्यंजने नाहीत. याशिवाय मराठीला अपरिचित असे-से, -पाईन, -थीन, -जोडे इ. प्रत्ययही आहेत. शब्दसंग्रहात आंडोर ‘मुलगा’, झो-या ‘सतरंजी’, वडांग ‘कुंपण’ यांसारखे अनेक अपरिचित शब्द आहेत. अहिराणीत लिखित साहित्य नाही पण मराठीच्या इतर बोलींप्रमाणे लोकसाहित्य भरपूर आहे. कविश्रेष्ठ निंबाजी यांनी 1648 मध्ये लिहिलेल्या ‘पोथी’ वाङ्मयात अहिराणी भाषेचा वापर केला आहे. वारकरी संप्रदायात संत एकनाथांनी अहिराणी भारुड लिहिले आहे तर ज्ञानेश्वर माऊलींनी अहिराणी गवळण लिहिली आहे.

अहिराणीचा शब्दांचा खजिना आहे. तसा अहिराणीची खाद्य संस्कृती आता भारतभर लोकप्रिय होत चालली आहे. ‘मोदक’ला धोंडफय, बाजरीच्या भाकरीला मेंगरा चानकी- सर्व कडधान्य एकत्र करून त्याचे पीठ करून केलेली ‘कयनानी भाकर’ बाजरीची खिचडी- जिला अहिराणीत ‘ढासलं’ म्हणतात. वांगानं भरीत, पुडन्या पिठन्या पाटोडय़ा, गव्हाची खिचडी जिला ‘थुली’ म्हणतात. पुरणपोळीच्या डाळीच्या पाण्याचा सार करून त्यात ‘पिठाचे’ तुकडे सोडले की त्याला ‘डुबुक वडय़ा’ म्हणतात. अहिराणी लयबद्ध शब्दांमुळे आणि प्रांतवार वैशिष्टय़ांमुळे ओळखली जाते. जसं- धुळ्याची अहिराणी वेगळी, जळगाव व नाशिक इथली वेगळी आणि बागलाण, नंदुरबारची अहिराणी वेगळी. आपले वाङ्मयीन सांस्कृतिक सौंदर्य प्रकट करणारी बोली आजही बोलली जाते.