तुझ्या प्रेयसीला जीवे मारून टाकेन! वरुण धवनला चाहतीची धमकी

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूड कलाकारांच्या जबरा फॅनचे अनेक किस्से आपण सगळ्यांनी ऐकले असतील. पण कधीकधी हे फॅन्स प्रत्यक्ष कलाकाराचीच डोकेदुखी होतात. असाच एक प्रकार अभिनेता वरुण धवनसोबत घडला आहे. एका चाहतीने त्याच्या प्रेयसीचा जीव घेण्याची धमकी दिली आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, वरुण धवनच्या मागे वेडी असलेली ही चाहती गेले काही दिवस तासन्तास त्याच्या घराबाहेर उभी राहायची. तिला वरुणला भेटायचं होतं. पण, सध्या वरुण त्याच्या आगामी कलंकच्या प्रमोशनसाठी बाहेर होता. त्यामुळे ती त्याला भेटू शकली नाही. तिने वरुणला भेटण्यासाठी त्याच्या घराबाहेरील सुरक्षा रक्षकांना विनंती केली. पण, सुरक्षा रक्षकांनी तिला मनाई करत वरुण तिला भेटू शकत नसल्याचं सांगितलं. त्यावर संतापलेल्या तरुणीने त्याच्या घराबाहेरच गोंधळ घालायला सुरुवात केली. आधी तिने स्वतःला इजा करून घेण्याची धमकी दिली आणि त्यानंतर वरुणची प्रेयसी नताशा दलाल हिला जीवे मारण्याची धमकी दिली.

तिच्या धमकीमुळे सुरक्षा रक्षकांनी पोलिसांना पाचारण केलं. सांताक्रुझ पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी वरुण याच्याशी बोलल्यानंतरच एफआयआर नोंद करणार असल्याबाबत सांगितलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या