
नायगाव जेटीवरून पाणजू गावाकडे निघालेल्या एका फेरीबोटीला खाडीच्या मध्यभागी असताना भगदाड पडले आणि बोट पाण्याने भरू लागली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे बोटीतील ९० प्रवाशांची आरडाओरड सुरू झाली. मात्र चालकाने प्रसंगावधान राखत बोटीचा वेग वाढवला आणि ती किनाऱ्याकडे वळवली. थोड्या वेळात बोटीत शिरलेले पाणी इंजिनमध्ये गेले आणि बोट किनाऱ्याजवळच बंद पडली. मात्र खाली चिखल असल्यामुळे बोट बुडण्याचा धोका टळल्याने सर्वच प्रवाशांची सुटकेचा निःश्वास सोडला. जर बोट मागेच बंद पडली असती तर मोठा अनर्थ घडला असता. मात्र दैव बलवत्तर असल्याने सर्वच प्रवासी बालबाल बचावले.
वसई-नायगाव खाडी व भाईंदर खाडी यामधील परिसरात पाणजू बेट आहे. बेटाच्या सभोवतालचा परिसर हा संपूर्ण खाडीच्या पाण्याने वेढलेला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना पाणजू बंदर ते नायगाव बंदर असा बोटीने प्रवास करावा लागतो. नायगाव जेटीवरून पाणजू बेटावर जाण्यासाठी निघालेल्या बोटीत बाजारहाट करून परतणारे तसेच गावातील उत्तरकार्यासाठी जाणारे लोक असे सुमारे नव्वद प्रवासी बसले होते. ही बोट खाडीच्या मध्यावर पोहोचताच बोटीला अचानक भगदाड पडले. त्यामुळे बोटीत पाणी भरू लागले. पाणी भरल्याने बोट वळवणे चालकाला कठीण होऊन बसले. त्यामुळे बोटचालकाने बोटीचा वेग वाढवून ती किनाऱ्यावर नेण्याचा प्रयत्न सुरू केला. बोटीला भगदाड पडून पाणी आत येत आहे, हे निदर्शनास आल्यानंतर प्रवाशांची आरडाओरड सुरू झाली. जसजसे पाणी बोटीवर येऊ लागले तसतसा प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकू लागला. किनारा गाठताना इंजिनमध्ये पाणी शिरून बोट बंद पडली. पण, चाल काच्या प्रसंगावधानामुळे इंजिन बंद पडेपर्यंत बोट किनाऱ्यावर पोहोचली होती.
ज्या ठिकाणी बोट बंद पडली तिथे चिखल होता. बोट चिखलात रुतल्यामुळे बुडण्यापासून वाचली आणि सर्व प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला. बोटीची तपासणी केली असता बोटीला दगड लागल्यामुळे सहा इंचाच्या व्यासाचे भगदाड पडल्याचे उघड झाले. दोन वर्षांपूर्वी पाणजू बेटावर घडलेल्या अशाच बोट दुर्घटनेत बुडून दोन जणांचा मृत्यू झाला होता. तर नुकताच नायगाव-भाईंदर खाडीपुलावर निर्माल्याचा नारळ डोक्यात पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटनाही घडली होती. वारंवार घडणाऱ्या या दुर्घटनांमुळे येथील रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे.
सुरक्षित प्रवासाचा मुद्दा पुन्हा चर्चेत
पाणजू बेटावरील नागरिकांना गावातून ये-जा करण्यासाठी रेल्वे पुलावरून चालत जावे लागते किंवा फेरीबोटीचा वापर करावा लागतो. बोटीतून केवळ प्रवासीच नव्हे तर रेशन, गॅस सिलिंडर, अवजड बांधकाम साहित्य, दुचाकीची वाहतूक केली जाते. प्रवाशांना वेळेवर पोहोचायचे असल्याने बोटीच्या क्षमतेपेक्षा कितीतरी पटीने अधिक प्रवासी जीव मुठीत धरून प्रवास करतात. त्यामुळे शासनाने तातडीने एक नवीन मोठी सुरक्षित बोट उपलब्ध करून द्यावी तसेच दैनंदिन प्रवासासाठी उड्डाणपूल बांधावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.



























































