
आशिका गौंड या चिमुकलीच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी जिल्हा शिक्षण विभागाने उच्चस्तरीय समिती गठित केली आहे. या समितीत उपशिक्षण अधिकारी, गटशिक्षण अधिकारी, महिला विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती शाळेतील शिक्षक, विद्यार्थी यांची सखोल चौकशी करणार असून घडलेल्या प्रकाराबाबत तांत्रिक यंत्रणाचाही तपास करणार आहे. समितीने सादर केलेल्या अहवालानंतर शिक्षण विभाग दोषींवर कठोर कारवाई करणार आहे.
१० मिनिटे उशीर झाला म्हणून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना १०० उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. या शिक्षेमुळे १३ वर्षीय चिमुकली आशिका गौंड हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही संतापजनक घटना उघडकीस आल्यानंतर सर्वत्र तीव्र पडसाद उमटले. ही बाब लक्षात येताच रविवारी जिल्हा शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी आशिकाच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी कुटुंबीयांनी टाहो फोडत केवळ शाळेच्या निष्काळजीपणामुळे मुलीचा जीव गेल्याचा आरोप केला. तसेच दोषींवर कठोर कारवाई करून न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार सखोल चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती गठित केल्याचे जिल्हा शिक्षण प्राथमिक विभागाच्या अधिकारी सोनाली मातेकर यांनी सांगितले.
पोलिसांकडूनही तपास सुरू
वालीव पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. अद्याप शवविच्छेदन अहवाल व अन्य चाचण्यांचे रिपोर्ट मिळाले नसून ते प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप घुगे यांनी दिली.





























































