वसंतदादा शेतकरी साखर कारखान्याचा कोविड रुग्णालयासाठी प्रस्ताव

352

वसंतदादा शेतकरी साखर कारखान्यामार्फत 100 खाटांच्या कोविड रुग्णालयासाठी महापालिका व जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आल आहे. याबाबतची माहिती कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी दिली. राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सहकारी कारखान्यांना कोविड रुग्णालय उभारणीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनला प्रतिसाद देत कारखान्याने हा प्रस्ताव सादर केला आहे. कारखान्याच्या कार्यस्थळावरच तातडीने रुग्णालय उभारण्याची तयारी कारखान्याने दर्शवली आहे.

कोरोनाचे संकट जागतिक आणि बिकट आहे. सरकारी यंत्रणा कोरोनाशी मुकाबला करत आहे. मात्र, त्यांना काही मर्यादा येत आहेत. त्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्यातील साखर कारखान्यांना कोविड रुग्णालयाच्या उभारणीत पुढाकार घेण्याचे आवाहन केले होते. वसंतदादांचे कुटुंबिय नेहमीच जनतेच्या हितासाठी अग्रेसर राहिले आहेत. कारखान्याच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कामे यापूर्वी झालेले आहेत. कोरोना काळात पहिल्या टप्प्यातच वसंतदादा कारखान्याने सॅनिटायझरचे उत्पादन करुन ते अनेक गावांमध्ये मोफत वाटप केले होते. तसेच ते अल्पदरात नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले. आयसोलेशन व क्वॉरंटाईनसाठी वसंतदादा कारखान्याची जागा उपलब्ध करुन देण्यात आली होती.

आता सांगली जिल्ह्यात तसेच सांगली महापालिका क्षेत्रात वाढणारा कोरोना संसर्ग लक्षात घेत कारखाना कार्यस्थळावर तातडीने 100 खाटांचे कोविड हॉस्पिटल उभारण्याची तयारी कारखान्याने दर्शवली आहे. त्यासाठी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांना प्रस्ताव देण्यात आला आहे. तर सभासदांच्यावतीने जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांच्याकडेही प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. महापालिका आयुक्तांनी जागेची पाहणी केली आहे. शासनामार्फत हे रुग्णालय चालवावे किंवा त्यांची अडचण असल्यास आम्ही हे रुग्णालय चालविण्याची तयारी दर्शविली आहे. ऑक्सिजन पुरवठ्यासह हे कोविड रुग्णालय करण्याचा आमचा प्रस्ताव असून तो तातडीने मंजूर केल्यास रुग्णांची चांगली सोय होईल, असे विश्‍वास विशाल पाटील यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या