वसंतराव देशपांडे जन्मशताब्दी, राज्यभरात 2 मेपासून विविध कार्यक्रम

सामना प्रतिनिधी । मुंबई

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील महान गायक, अभिनेते डॉ. वसंतराव देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष 2 मे 2019 पासून सुरू होत आहे. यानिमित्त वसंतराव देशपांडे संगीत सभेतर्फे राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत संगीत कार्यशाळा आणि वसंतरावांची गायकी कशी घडली यावर लघुपट करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे.

वसंतराव देशपांडे यांचे पट्टशिष्य आणि संगीत सभेचे संस्थापक पंडित चंद्रकांत लिमये, गायिका फैय्याज, रवींद्र आवटी, राजू हळदणकर यांनी आज पत्रकार परिषदेत जन्मशताब्दी महोत्सवाची माहिती दिली. जन्मशताब्दी सोहळय़ाचे उद्घाटन येत्या 5 मे रोजी रवींद्र नाटय़मंदिर, प्रभादेवी येथे सायंकाळी 5 वाजता होणार आहे. यावेळी अच्युत गोडबोले, पंडित शंकर अभ्यंकर, पंडित सत्यशील देशपांडे, माजी पोलीस आयुक्त अरविंद इनामदार, माजी मुख्यमंत्री डॉ. मनोहर जोशी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यानंतर वसंत बहार हा वसंतरावांच्या गायकीचे दर्शन घडवणारा कार्यक्रम सादर होईल. पंडित चंद्रकांत लिमये आणि त्यांचे शिष्य हा कार्यक्रम करतील. ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे आणि युवा गायिका नुपूर काशीद-गाडगीळ यांच्या गायनाचा आनंद रसिकांना मिळेल. ‘वसंतराव देशपांडे – एक स्मरण’ आणि ‘कटय़ार… एक सुरम्य प्रवास’ हे कार्यक्रम सादर होतील. तसेच नक्षत्र वसंत ही स्मरणिका प्रकाशित केली जाणार आहे.

कोणत्याही मोठय़ा गायकाची गायकी कशी घडली, हे दर्शवणारी फिल्म आतापर्यंत कुणीही केलेली नाही. वसंतरावांची गायकी कशी घडली, याबाबत लघुपट तयार करण्याचा, त्याचे डॉक्युमेंटेशन करणार आहोत. जुन्या काळातील रसिकांना वसंतरावांच्या गायकीचा पुनŠप्रत्यय आनंद देणे आणि तरुण पिढीला प्रोत्साहन देणे, हा लघुपटाचा उद्देश आहे. – पंडित चंद्रकांत लिमये, गायक