मराठी बोलतो, असे सांगणाऱया विद्यार्थ्यावर हॉकी स्टिकने हल्ला, वाशीतील आयसीएल कॉलेजच्या गेटवर घडला संतापजनक प्रकार

vashi-college-student-attacked-hockey-stick-speaking-marathi-icl-college-incident

मी मराठीमध्ये बोलतो, असा मेसेज व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकणाऱ्या एका 20 वर्षीय विद्यार्थ्यावर त्याच्याच वर्गातील विद्यार्थ्यांनी हॉकी स्टिकने हल्ला केला. हा प्रकार वाशी येथील आयसीएल कॉलेजच्या गेटवर घडला. या प्रकरणी वाशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ठाणे-बेलापूर रोडवरील पावणे गावात राहणारा सूरज पवार (20) हा आयसीएलईएस मोतीलाल झुझुनवाला कॉलेजमध्ये एसवाय आयटी या वर्गात आहे. या वर्गातील विद्यार्थ्यांनी एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला आहे. याच ग्रुपवर सूरज याने काही मेसेज टाकले होते. मी मराठीमध्ये बोलतो असे तो म्हणाला होता. त्यावरून फैजन खान आणि त्याचा शाब्दिक वाद ग्रुपवर झाला. दुसऱया दिवशी सूरज कॉलेजला गेला असता फैजान आणि त्याच्या दोन मित्रांनी त्याला गेटवरच थांबवले. त्या ठिकाणी फैजान याने सूरजच्या डोक्यात हॉकी स्टिक घातली. अन्य दोघांनी लाथाबुक्क्यांनी त्याला बेदम मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाला.

पोलिसांत तक्रार न देण्यासाठी धमकी

सूरज हा पालिका रुग्णालयात उपचार घेत असताना फैजान याने फोन करून पोलिसांत तक्रार न करण्यासाठी धमकावले. तक्रार केल्यास त्याचे परिणाम आणखी वाईट होतील, असेही सूरजला सांगण्यात आले. त्यामुळे सूरज घाबरला. चालताना पडल्यामुळे ही दुखापत झाली असे त्याने खोटे डॉक्टरांना सांगितले. मात्र नंतर वाशी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.