सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्यासाठी शिफारशीची गरज नाही! – केंद्र सरकार

791

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ देण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून होत आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपल्या अजेंड्यामध्येही त्याचा उल्लेख केला होता. मंगळवारी हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी लोकसभेत सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्याबाबतचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावर सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्यासाठी कोणत्याही औपचारिक शिफारशीची गरज नाही. योग्यवेळीच ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला जातो, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले.

सावरकरांना ‘भारतरत्न’ हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्याची शिफारस केंद्र सरकारकडे आली आहे का? यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्राने महत्त्वाचा खुलासा केला आहे. भाजपचे मुंबईतील खासदार गोपाळ शेट्टी यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्यासाठी कोणत्याही औपचारिक शिफारशीची गरज नाही, योग्यवेळी निर्णय घेतला जाईल, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

‘केंद्राकडे अनेकदा वेगवेगळ्या माध्यमातून ‘भारतरत्न’ देण्यासंदर्भातील शिफारशी केल्या जातात. मात्र ‘भारतरत्न’ पुरस्कारासाठी शिफारस करण्याची आवश्यकता असते असे नाही. शिफारस केली नसतानाही हा पुरस्कार दिला जाऊ शकतो. ‘भारतरत्न’ देण्यासंदर्भातील निर्णय योग्य वेळी घेतला जातो’, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या