वीर, उजनीतील पाण्यामुळे पंढरपूरला पुराचा धोका

पंढरपुरातलं उजनी आणि वीर धरण 100 टक्के भरल्यामुळे वीर धरणातून 32 हजार, तर उजनी धरणातून 1 लाख 11 हजार 600 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. दोन्ही धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदीपात्रातील बंधारे पाण्याखाली गेले असून, पंढरपूरला पुराचा धोका निर्माण झाला आहे. रात्री नदीपात्रातील पाणी बाहेर येण्याची शक्यता असून, नदीकाठच्या व्यासनारायण झोपडपट्टी व अंबाबाई पटांगण झोपडपट्टी येथील कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

रविवारी दुपारी वीर धरणातून 61 हजार 923 क्युसेक विसर्ग सुरू होता, तो रात्री कमी करून 32 हजार करण्यात आला आहे. मात्र, उजनी धरणातून सुरू केलेला 20 हजार क्युसेकचा विसर्ग वाढवून सोमवारी दुपारी तो 1 लाख 11 हजार 600 क्युसेक करण्यात आला आहे. त्यामुळे भीमा नदीपात्रात (चंद्रभागा) 1 लाख 44 हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे. हा मोठा विसर्ग सोमवारी रात्री पंढरपूर येथे दाखल होण्याचा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासन सज्ज झाले आहे. नदीकाठच्या गावांना तसेच नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, चंद्रभागेला आलेल्या पुरामुळे पंढरपूर येथील नदीपात्रातील पुंडलिक मंदिर निम्मे बुडाले आहे. तर इतर लहान मंदिरे पाण्याखाली गेली आहेत.

झोपडपट्टीधारकांचे स्थलांतर

उजनी व वीर धरणातून भीमा नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्यामुळे नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावे, अशा सूचना पंढरपूर नगरपालिका, महसूल व पोलीस प्रशासनाने दिल्या आहेत. नदीपात्रालगतच्या व्यास नारायण झोपडपट्टी व अंबाबाई पटांगण झोपडपट्टी येथील 35 झोपडपट्टीधारकांना स्थलांतरासाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. काल दुपारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सचिन लंगुटे, उपमुख्याधिकारी ऍड. सुनील वाळूजकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी व्यास नारायण झोपडपट्टी व अंबाबाई पटांगण झोपडपट्टी येथे पाहणी केली. पूरपरिस्थिती पाहता नागरिकांनी त्वरित स्थलांतर करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

8 बंधारे पाण्याखाली

भीमा नदीला आलेल्या पुरामुळे पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली, गुरसाळे, कौठाळी, पंढरपूर, गोपाळपूर, मुंढेवाडी, आंबे, पुळूज हे 8 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

भाविकांसाठी घाट बंद

पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी व चंद्रभागा स्नान करण्यासाठी दररोज हजारो भाविक येत आहेत. मात्र, चंद्रभागेला पूर आल्याने प्रशासनाने सतर्कता बाळगली आहे. शहरातील घाटांवर बॅरेकेडिंग लावून ते बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे भाविकांना स्नान न करताच माघारी फिरावे लागत आहे. आठही बंधारे बॅरेकेडिंग लावून बंद करण्यात आले आहेत. तेथे पोलीस व महसूल प्रशासन लक्ष ठेवून आहे.