राज्यात वाहनांची खरेदी घटली

617

मंदीच्या फेऱयामुळे ऑटोमोबाईल क्षेत्राला फटका बसला असून राज्यासह मुंबईतील वाहनांची खरेदी आणि आरटीओतील नोंदणी यंदा घसरल्यामुळे राज्य सरकारच्या गंगाजळीतील उत्पन्न घटले आहे. राज्यातील आरटीओमधील वाहनांची नोंदणी 15 टक्के घसरली आहे.

राज्यात प्रादेशिक परिवहन विभाग सांभाळणारा परिवहन विभाग महसूल उत्पन्न 2015 पर्यंत इतर विभागांच्या तुलनेत सर्वाधिक महसूल गोळा करणारा विभाग होता.  गेल्या आर्थिक वर्षात 2018-19 साली आरटीओद्वारे परिवहन विभागाला 8,672 कोटी उत्पन्न मिळाले होते. यंदाच्या 2019-20 या आर्थिक वर्षात या विभागाला वाहनांच्या नोंदणी आणि इतर करांद्वारा 8,249 कोटी इतके उत्पन्न मिळण्याची अपेक्षा होती, परंतु प्रत्यक्षात नोव्हेंबरपर्यंत आकडेवारी पाहता केवळ 5,466 कोटी रुपये गंगाजळीत जमले आहेत. नवीन वाहने खरेदी करून त्यांची आरटीओकडे नोंदणी करण्यात येत असते. 2019 मध्ये नोव्हेंबरपर्यंत 23.10 लाख वाहनांची नोंदणी झाली असून गेल्या वर्षी 2018 मार्च ते एप्रिल संपूर्ण आर्थिक वर्षात 27.14 लाख वाहनांची नोंदणी झाली होती. यंदाची आकडेवारी पाहता यंदा दोन लाख वाहनांची नोंदणी घटली असली तरी उर्वरित महिन्यात हे टार्गेट पूर्ण करण्याचे परिवहन विभागाचा प्रयत्न आहे.

राज्यात 3.53 कोटी तर मुंबईत 36 लाख वाहने

आकडेवारी पाहता राज्यात एकूण वाहने 3.53 कोटी इतकी असून राज्याची लोकसंख्या 11 कोटी इतकी आहे, तर मुंबईत एकूण वाहनांची संख्या 36 लाख 15 हजार 157 इतकी झाली आहे. त्यात दुचाकींची संख्या 21 लाख 29 हजार 456 तर कारची संख्या 10 लाख 31हजार 2 इतकी झाली आहे. सुदैवाने यंदा राज्यातील वाहन अपघातांमध्ये मात्र 7.4 टक्के इतकी घसरण झाली आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या