
झटपट श्रीमंत होण्यासाठी दुचाकींची चोरी करणाऱ्या सराईताला गुन्हे शाखेच्या युनीट दोनने अटक केली आहे. त्याच्याकडून वाहनचोरीचे चार गुन्हे उघडकीस आणून सव्वा लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. चंद्रकांत विष्णू वाघमारे (वय 27, रा.अंत्रोली, वेल्हे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
मालधक्का चौकात एकजण चोरीची दुचाकी घेऊन उभा असल्याची माहिती पोलीस हवालदार नामदेव रेणुसे यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, एपीआय प्रकाश मोरे, किशोर वगू, चेतन गोरे यांनी सापळा रचून चंद्रकात वाघमारे याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने ताब्यातील दुचाकी साधू वासवानी चौकातून चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून शिरवळ, हवेली, सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेल्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, एपीआय प्रकाश मोरे, एपीआय वैशाली भोसले, यशवंत आंब्रे, नामदेव रेणुसे, गजानन सोनुने, चेतन गोरे, निखील जाधव यांनी केली.



























































