‘जाने भी दो यारो’, ‘तमस’चे संगीतकार वनराज भाटिया यांचे निधन

बॉलीवूडच्या अनेक गाजलेल्या चित्रपट, मालिका आणि जाहिरातींना संगीत देणारे ज्येष्ठ संगीतकार वनराज भाटिया यांचे आज मुंबईतील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ते 93 वर्षांचे होते. वयोमानानुसार त्यांना अनेक शारीरिक व्याधींनी जखडले होते. त्यांच्या निधनामुळे संगीतसृष्टीवर शोककळा आहे.

वनराज भाटिया यांनी लंडनच्या रॉयल अकॅडमी ऑफ म्युझिकमधून संगीताचे शिक्षण गिरवले होते. 1959 मध्ये हिंदुस्थानात परतल्यानंतर त्यांनी आपल्या करिअरचा श्रीगणेशा जाहिरातींसाठी जिंगल बनवण्यापासून केला. सुमारे सात हजार जाहिरातींसाठी त्यांनी जिंगल दिले आहेत. श्याम बेनेगल यांच्या ‘अंकुर’ (1972) या चित्रपटाच्या पार्श्वसंगीताद्वारे त्यांना मोठा ब्रेक मिळाला.

त्यानंतर ‘जाने भी दो यारो’, ‘पेस्तोनजी’, ‘तरंग’, ‘पर्सी’, ‘द्रोह’, ‘काल’ या चित्रपटांना संगीत देण्यासह त्यांनी ‘अजूबा’, ‘बेटा’, ‘दामिनी’, ‘घातक’, ‘परदेस’, ‘चमेली’ यासारख्या चित्रपटांना पार्श्वसंगीत दिले. अमोल पालेकरांच्या ‘बनगरवाडी’ या मराठी चित्रपटासाठीही त्यांनी अप्रतिम पार्श्वसंगीत दिले होते. ‘वागले की दुनिया’, ‘भारत एक खोज’ या टीव्ही शोजसाठी देखील संगीतकार म्हणून काम केले.

प्रतिभावंत संगीतकार गमावला – लता मंगेशकर

प्रतिभावंत संगीतकार वनराज भाटिया यांच्या निधनाची बातमी ऐकून मला धक्काच बसला. मी त्यांच्यासोबत एकच गाणे गायले होते. ते मला बहिणीप्रमाणे मानायचे. त्यांना मी कधीच विसरू शकत नाही, अशा शब्दांत गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

मिळालेले पुरस्कार

1988 साली गोविंद निहलानी दिग्दर्शित ‘तमस’ चित्रपटाच्या संगीतासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 1989 मध्ये संगीत अकादमी आणि 2012 साली पद्मश्री पुरस्काराने वनराज यांना सन्मानित केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या