भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस जयवंत परब यांचे निधन

शिवसेनेचे माजी नगरसेवक, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस जयवंत परब (70) यांचे प्रदीर्घ आजाराने शनिवारी लीलावती रुग्णालयात निधन झाले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार पंचतारांकित हॉटेलांत भारतीय कामगार सेनेची युनियन अधिक बळकट करण्यात जयवंत परब यांचा मोलाचा काटा होता. मागील चार महिन्यांपासून जयवंत परब यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्यांच्या प्रकृतीत विशेष सुधारणा झाली नाही. शनिवारी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. जयवंत परब यांच्या पार्थिवावर आज अंधेरीतील आंबोली स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

शिवसेनेचे नगरसेवक म्हणून ते अंधेरी विभागातून निवडून आले होते.  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार मराठी माणसाला न्याय देण्यासाठी जयवंत परब अनेक आंदोलनांत हिरिरीने सहभागी झाले. पंचतारांकित हॉटेलांत भारतीय कामगार सेनेची युनियन मजबूत करतानाच अनेक मराठी माणसांना त्यांनी रोजगारही मिळवून दिला. त्यांनी सुरू केलेली समर्थ सहकारी पतपेढी आजही यशस्वीरीत्या सुरू असून अंधेरी, मसुरा येथे या पतपेढीच्या शाखा निघाल्या. मसुरा मालवण येथे त्यांनी भरतगड इंग्लिश मीडियम स्कूल सुरू केले. जयवंत परब यांना मधुमेह आणि किडनी विकाराचा त्रास असल्याने त्यांची प्रकृती खालावली होती. त्यातच लीलावती रुग्णालयात त्यांचे निधन झाले. रविवारी अंधेरी डी.एन. नगर, गणेश चौक येथील श्री. स. सावंत सभागृहात त्यांचे पार्थिक दुपारी 11 ते 1 वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर आंबोली स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, नात तसेच दोन भाऊ असा परिवार आहे.

मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

जयवंत परब यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. जयवंत परब हे तसे कडवट शिवसैनिक. कामगार क्षेत्रात शिवसेनेचा लढाऊ बाणा त्यांनी जपला. प्रकृती बरी नसतानाही ते अनेक वर्षे कामगार सेनेची जबाबदारी पार पाडत होते. त्यांना माझी विनम्र श्रद्धांजली, अशा भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या