विदर्भ, मराठवाड्यात दुधाचे उत्पादन 2 लाखांवरून 5 लाख लिटर करावे! मुख्यमंत्र्यांच्या सूचना

917
CM uddhav-thackeray

विदर्भ व मराठवाडय़ातील शेतकऱयांची कमकुवत आर्थिक स्थिती याचबरोबर तोट्यातील शेती, वाढणारे कर्ज व त्यामुळे आत्महत्यांचे वाढते प्रमाण यातून शेतकऱ्यांची मुक्तता करण्यासाठी दुग्ध व्यवसाय हमखास व शाश्वत उत्पन्नाचे साधन आहे. त्यामुळे दुधाचे उत्पादन प्रतिदिन दोन लाखांवरून पाच लाख लिटरपर्यंत वाढविण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  दिल्या.

राष्ट्रीय दुग्ध विकास बोर्डाचे अध्यक्ष दिलीप रथ यांच्यासोबत सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. मराठवाडा व विदर्भातील भौगोलिक स्थिती, सततचे दुष्काळ, सिंचनाचा अभाव यामुळे शेतकऱयांना झालेल्या दयनीय स्थितीतून बाहेर काढण्यासाठी शेतीपूरक व्यवसाय देण्याकरिता जोडधंद्यांमधून शाश्वत स्रोत उपलब्ध करण्यासाठी शासन शेतकऱयांमध्ये दुग्ध व्यवसायाकरिता क्षमता बांधणी करून भविष्यात शेतकऱ्यांची उत्पादनक्षमता वाढविण्यावर भर देणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मराठवाडा व विदर्भ दुग्ध विकास प्रकल्प मराठवाडय़ातील 11 जिल्ह्यांत 2 हजार 936 गावांमध्ये राबविण्यात येत होता. यामध्ये आता 1 हजार 326 गावांचा समावेश करण्यात आला आहे.

राष्ट्रीय दुग्ध विकास बोर्डाचे अध्यक्ष दिलीप रथ यांनी दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी भारतीय वंशाच्या दुधाळ गाई यामध्ये गिर, साहिवाल, राठी, लालशिंधी या गाई आणण्यात येतील. यामुळे शेतकऱयांना चांगले उत्पन्न मिळून चांगला भावही मिळेल. राज्य सरकारच्या सहकार्याने दुग्ध विकास बोर्ड, मदर डेअरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करून मराठवाडा व विदर्भातील शेतकऱयांची आर्थिक उन्नती करण्याचा प्रयत्न करणार आहे. शेतकऱयांशी समन्वय साधून त्यांच्यात जनजागृती करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या