येत्या काही दिवसांत विदर्भातही शिवसेनेची ताकद अधिक वाढलेली दिसेल!

आगामी निवडणुका केंद्रस्थानी ठेवून शिवसेना व युवा सेनेची फळी मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान राबविले जात आहे, तर युवा सेनाही संवाद दौऱयाच्या माध्यमातून संघटन मजबूत करीत आहे. विदर्भात हे अभियान राबविणे सुरू झाले असून त्याची सुरुवात आज नागपुरातून करण्यात आली. युवा सेना बुथस्तरावर संघटनात्मक बांधणी करीत आहे. आशीष शिरवडकर हे नागपुरात आठवडाभर थांबून युवा सेनेचा विस्तार करणार आहेत. अनेक युवक आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात काम करायला तयार आहेत. येत्या काही दिवसांत शिवसेनेची ताकद अधिक वाढलेली दिसेल, असा विश्वास शिवसेनाप्रणीत युवा सेनेचे राष्ट्रीय सचिव वरुण सरदेसाई यांनी व्यक्त केला.

युवा सेनेचे संवाद सोहळा अभियान महाराष्ट्रभर राबविण्यात येत आहे. मराठवाडय़ातील चार जिह्यांत हे अभियान राबविण्यात आले. विदर्भात हे अभियान सुरू झाले असून त्याची आज बुधवारी नागपुरातून सुरुवात करण्यात आली. युवा सेनेच्या या संवाद दौऱयानिमित्त आलेले सरदेसाई पत्रकार परिषदेत बोलत होते. पुढे सरदेसाई यांनी सांगितले की, शिवसेना आज पहिल्या क्रमांकाचा पक्ष झालेला आहे. अनेक युवक आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात काम करायला तयार आहेत. येत्या काही दिवसांत शिवसेनेची ताकद वाढलेली दिसेल. आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढायच्या की आघाडीने लढायच्या याबाबतचा निर्णय पक्षप्रमुख घेतील, परंतु या निवडणुकांनंतर होणाऱया विद्यापीठ सिनेट निवडणुकीत युवा सेना ताकदीने उतरेल, असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी खासदार कृपाल तुमाने, आमदार अॅड. आशीष जयस्वाल, आमदार दुष्यंत चतुर्वेदी, आदित्य शिरोडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

निष्क्रिय पदाधिकाऱयांच्या जागी नव्यांना संधी

पक्षात चांगले काम करणाऱयांना बढती देण्यात आलेली आहे, परंतु जे पदाधिकारी क्रियाशील नाहीत, त्यांच्या जागी नवीन लोकांना संधी दिली जात आहे. मुंबईत 36 पदाधिकाऱयांचा खांदेपालट करण्यात आला. अमरावती जिह्यात मुलाखती घेऊन पदाधिकाऱयांची नियुक्ती केली जाईल. काही ठिकाणी नव्या दमाच्या कार्यकर्त्यांची निवड मुलाखतीद्वारे करू, असेही सरदेसाई म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या