Video : जेव्हा कोकणातील झाडातून नळासारखे पाणी वाहू लागते…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । देवरूख

कोकणातील झाडातून नळासारखे पाणी वाहात असल्याचा चमत्कारीक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ देवरूख जवळील पूर या गावातील असल्याचा दावा केला जात असून कवळ तोडलेल्या या झाडातून तब्बल 45 मिनिटं नळासारखे पाणी वाहात होते असे गावकऱ्यांनी म्हटले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत ऐनाच्या झाडाच्या मध्यवर्ती भागातून नळासारखे पाणी पडताना दिसत आहे. हा व्हिडीओ वेगाने व्हायरल झाला आणि सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले. व्हिडीओवर पूर गावाचा उल्लेख असून हा प्रकार गेल्या काही दिवसात घडल्याचे बोलले जात आहे. क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना हा प्रकार आधी दिसल्याचे बोलले जात आहे. मात्र या झाडाभोवती अधिक तपासणी केली असता काही आढळले नाही. गावकऱ्यांनीही अधिक माहिती देण्यास नकार दिला.

दरम्यान, वनस्पती तज्ज्ञांना याबाबत विचारले असता त्यांनी पाण्याचा साठा असणाऱ्या भागावत ऐनाचे झाड असेल तर असा प्रकार होऊ शकतो असे म्हटले आहे. ही एक शास्त्रीय प्रक्रिया असून मुळाद्वारे खोडांमध्ये पाणी पोहोचते व खोडातून पानांवर्यंत. पाणी वाहून नेणाऱ्यां नळ्यांना (झायलम) इजा झाली तर असे नाळासारखे पाणी वाहू शकते असे तज्ज्ञांनी सांगितले.