केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर राज्यात कधी विधानसभेच्या निवडणुका होतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रात 15 ते 20 नोव्हेंबरदरम्यान विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे.
शरद पवार म्हणाले, ‘‘माझा स्वतःचा असा अंदाज आहे की, साधारणतः 6 ते 10 ऑक्टोबरदरम्यान निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करेल. त्यानंतर काही दिवसांनी आचारसंहिता लागू केली जाईल. आचारसंहितेची तारीखही त्याच दिवशी जाहीर केली जाईल. निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर साधारण आठवडाभराने उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. त्यानंतर 15 ते 20 नोव्हेंबरदरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडेल,’’ अशी शक्यता असल्याचे शरद पवार म्हणाले.
यंदा लोकांनी बदल करायचं मनावर घेतले आहे
लोकसभेला 400 पार करू असे पंतप्रधान सांगत होते, पण काय घडले हे आपण पाहिले. आज महाराष्ट्रातील वातावरण बदलले आहे. यंदा लोकांनीच बदल करायचे मनावर घेतले आहे. नेत्यांनी सांगितले तरी लोकांनी आपल्याला योग्य वाटेल तो निर्णय घेतला. मी राज्यभर फिरतो आहे. कुठेही गेलो तरी हजारोंच्या संख्येने लोक भेटत आहेत. लोकांनीच या निवडणुकीत जिंकायचं ठरवले आहे. त्यामुळे यंदा चांगले निकाल लागतील यात शंका नाही. असे शरद पवार म्हणाले.