
संसदेमध्ये प्रथम पाऊल टाकताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पायऱ्यांवर डोके ठेवले होते; पण आता तीच संसद नष्ट करण्याचे काम त्यांच्याकडून होत आहे. ‘सेंट्रल व्हिस्टा’चा खर्च 50 हजार कोटींकडे चालला आहे. स्वतःसाठी 15 हजार कोटींचा बंगला व त्याखाली हिटलरसारखे बंकर्स होत आहेत. महागाईमुळे हैराण झालेल्या जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजप जुन्या मशिदींवरून तेढ निर्माण करत असल्याची टीका राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी केली.
सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष निवडीच्या मुलाखती झाल्या. त्यानंतर पत्रकारांशी त्या बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, कविता म्हेत्रे, सरचिटणीस राजकुमार पाटील आदी उपस्थित होते.
चव्हाण म्हणाल्या, देशात महागाई वाढली आहे. लोकांचे लक्ष यापासून विचलित करण्यासाठी भाजप मंदिर-मशिद वाद निर्माण करत आहे. आम्ही सांगू तोच हिंदू धर्म असे त्यांचे ढोंगी हिंदुत्व आहे. गाईची हत्या झाल्यानंतर मुस्लिम बांधवांचे खून पाडण्यात आले. आज लम्पी आजारामुळे गाईचे मृत्यू होत आहेत. भाजपचे गोमाता प्रेम आता कुठे गेले? ज्यावेळी लम्पी आजाराची सुरुवात झाली, त्याचवेळी तत्परतेने उपाययोजना झाल्या असत्या तर आज ही वेळ आली नसती. भाजपने ईडीचा वापर धूर्तपणे केला आहे, अनिल देशमुख पंधरा महिन्यांपासून तुरुंगात आहेत. नबाब मलिक भांडाफोड करत असल्यामुळे त्यांनाही तुरुंगात टाकले. सरकारची ही अघोषित आणीबाणी असल्याचेही त्या म्हणाल्या.



























































