क्रूझ कलंडून 37 ठार, व्हिएतनामच्या समुद्रात अचानक वादळ उठले!

व्हिएतनामच्या समुद्रात एक क्रूझ 90 अंशात कलंडून झालेल्या अपघातात 37 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 10 जण बेपत्ता झाले आहेत. ‘वंडर सी’ असे या अपघातग्रस्त क्रूझचे नाव आहे. या  क्रूझवर पाच कर्मचारी व 48 पर्यटकांसह एकूण 53 प्रवासी होते. त्यात 20 लहान मुलांचाही समावेश होता. क्रूझमधील बहुतेक पर्यटक व्हिएतनामची राजधानी हनोईचे होते. व्हिएतनामच्या ‘हा लाँग बे’ या पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी ही क्रूझ चालली होती. पर्यटन सुरू असताना अचानक वादळ उठले आणि वाऱयाच्या झोतामुळे क्रूझ एका बाजूला कलंडली. त्यामुळे प्रवासी पाण्यात बुडाले. क्रूझ कलंडल्याची माहिती मिळताच यंत्रणांनी तातडीने धाव घेतली व बचावकार्य हाती घेतले, मात्र बचाव यंत्रणांचे प्रयत्न अपुरे ठरले. मदत पोहोचेपर्यंत अनेकांचा मृत्यू झाला होता.