
व्हिएतनाममध्ये यंदाच्या वर्षातील सर्वात शक्तिशाली वादळ काजीकी (Typhoon Kajiki) मध्य व्हिएतनामच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. या वादळाची गती ताशी 175 किलोमीटर असून, सोमवारी दुपारी ते थान होआ आणि हा तिन्ह प्रांतांच्या दरम्यान किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. यामुळे व्हिएतनाममधील चार मध्यवर्ती प्रांतांमधून 5.86 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.
आपत्कालीन उपाययोजना आणि बंदोबस्त
व्हिएतनाम सरकारने वादळाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन उपाययोजना तातडीने लागू केल्या आहेत. थान होआ, क्वांग त्रि, ह्यू आणि दा नांग या प्रांतांमधील सुमारे 1.52 लाख घरांना अंतर्देशीय सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वादळामुळे होणाऱ्या मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलनाचा धोका असल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. व्हिएतनाम एअरलाइन्स आणि व्हियेटजेट यांसारख्या विमान कंपन्यांनी अनेक उड्डाणे रद्द केली असून, थान होआ आणि क्वांग बिन्ह प्रांतातील विमानतळ बंद करण्यात आले आहेत.
दरम्यान, काजीकी वादळाने चीनमधील हैनान बेट आणि ग्वांगडोंग प्रांताच्या काही भागांना रविवारी जोरदार तडाखा दिला. हैनान बेटावरील सान्या शहरात पर्यटक आकर्षणे, शाळा, दुकाने आणि कार्यालये बंद करण्यात आली असून, सार्वजनिक वाहतूकही स्थगित करण्यात आली आहे. चीनमधील 20,000 हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.