
साऊथ इंडस्ट्रिचा सुपरस्टार अभिनेता थलपती विजयच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. थलपती विजयच्या आगामी चित्रपट ‘जन नायगन’ च्या प्रदर्शनापूर्वीच त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशातच त्याच्या वर्क लाईफसोबतच आता पर्सनल लाईमध्ये वादळ येणार आहे. विजय याच्या पत्नीने त्याच्या गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांच्या न्यायहक्कासाठी तिने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. या वृत्ताने चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 1999 रोजी विवाहबंधनात अडकलेल्या या जोडीने आपल्या 27 वर्षांच्या वैवाहिक प्रवासाला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला आहे. संगीता यांनी चेन्नईजवळील चेंगलपट्टू कौटुंबिक न्यायालयात (Chengalpattu Family Court) अधिकृतपणे घटस्फोटाची याचिका दाखल केली असून, यामुळे सिनेसृष्टीत चर्चांना उधाण आले आहे.
विजय यांच्या पत्नी संगीता यांनी आपल्या याचिकेत विजयवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. विजयचे एका नामांकित अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा दावा त्यांनी केला आहे. एप्रिल 2021 मध्ये आपल्याला या प्रकरणाची माहिती मिळाली, असे त्यांनी याचिकेत नमूद केले आहे. विजयने हे संबंध संपवण्याचे आश्वासन देऊनही ते सुरूच ठेवल्यामुळे मानसिक छळ आणि विश्वासाला तडा गेल्याचे संगीता यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे.
संगीता यांनी असाही आरोप केला आहे की, संबंधित अभिनेत्री सोशल मीडियावर विजयसोबतच्या सहलींचे फोटो सतत शेअर करत होती. विजयने या फोटोंवर कोणताही आक्षेप घेतला नाही. ज्यामुळे आपली आणि मुलांची सार्वजनिकरित्या मानहानी झाली. न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर आता संगीता सध्या वेगळ्या राहत असल्याचे समोर आले आहे. तसेच संगीताच्या या निर्णयामुळे त्यांच्या कुटुंबाला त्रास होऊ नये यासाठी त्यांनी या प्रकरणाची सुनावणी ‘इन-कॅमेरा’ व्हावी आणि मीडियामध्ये याबाबत चर्चा होऊ नये, अशी विनंतीही न्यायालयाला केली आहे.
या घटस्फोटाच्या याचिकेवर न्यायालयाने विजयला प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. पुढील सुनावणी एप्रिल २०२६ मध्ये होण्याची शक्यता आहे. संगीता यांनी पोटगी (Alimony) आणि राहत्या घरातील हक्काचीही मागणी केली आहे. अद्याप विजयच्या बाजूने या प्रकरणावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, मात्र सोशल मीडियावर ‘थलापती’चे चाहते या बातमीने चिंतेत आहेत.




























































