चिल्लर व्यक्ती अजित पवारांना लांडगा म्हणत असेल, तर… विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली होती. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत. अजित पवारांना आम्ही मानत नाही, असे वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केले होते. या वक्तव्यानंतर गोपीचंद पडळकर आणि अजित पवारांच्या गटातील संघर्ष उफळून आला आहे. पडळकरांविरोधात ठिकठिकाणी आंदोलनही करण्यात आली. याबाबत आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पडळकरांसारखी चिल्लर व्यक्ती अजित पवार यांना लांडगा म्हणत असेल, तर ते काय आहेत, हे दाखवून देण्याची वेळ आली आहे. अशा लोकांना चिरडण्याची भूमिका ते घेतील. तेव्हा अजित पवार वाघ, सिंह आणि हत्ती आहेत, हे दाखवून देतील, असे वडेट्टीवार म्हणाले. धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाही. म्हणून धनगर आरक्षणाबाबत अजित पवार यांना पत्र देण्याची गरज नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत. अजित पवारांना आम्ही मानत नाही आणि कधी पत्रही दिले नाही. पुढेही देण्याची आवश्यकता वाटत नाही, असे पडळकर म्हणाले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.