नाशिक हनी ट्रॅपच्या सीडीमुळेच मिंधे सत्तेत, विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हनी ट्रॅपचे आरोप फेटाळले, पण त्याचे भक्कम पुरावे आमच्याकडे आहेत, ती सीडी लावायची झाली तर दहा-वीस हजार तिकीट लावावे लागेल, मिंधे सरकारही नाशिकमधील हनी ट्रॅपच्या सीडीमुळेच सत्तेवर आले, असा खळबळजनक दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज केला.

मंत्रालय, नाशिक आणि ठाणे ही हनी ट्रॅपची केंद्रे बनली आहेत असा आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभेत केला होता. त्यावेळी त्यांनी एक पेनड्राईव्हही दाखवला होता. त्यावर सरकारने निवेदन करावे अशी मागणी पटोले यांनी केली होती, पण सरकारने निवेदन केले नाही. उलट मुख्यमंत्री फडणवीस यांनी हनीही नाही आणि ट्रॅपही नाही, नानाभाऊंचा बॉम्ब सरकारपर्यंत पोहोचलाच नाही, असे म्हणत पटोले यांचा आरोप फेटाळला होता. त्या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी आज हा दावा केला.