मंथन – मोठ्या उलथापालथीची भीती?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रा. विजया पंडित

भूकंपशास्त्रज्ञांच्या मते, हिमालयाच्या भूकंपप्रवण क्षेत्रात वसलेला नेपाळ हा अशा देशांपैकी एक आहे, जिथे भूकंपाचा सर्वाधिक धोका आहे आणि पश्चिम डोंगराळ भागात मोठे भूकंप होण्याची शक्यता आहे. सरकारच्या ‘पोस्ट डिझास्टर नीड्स असेसमेंट’ अहवालानुसार, नेपाळ हा भूकंपाच्या बाबतीत जगातील 11 वा सर्वात धोकादायक देश आहे. अलीकडेच नेपाळच्या पश्चिमेकडील टेकडय़ांमध्ये 6.4 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप झाला. 2023 मध्ये आतापर्यंत नेपाळला 70 भूकंपाचे धक्के बसले आहेत. गेल्या काही काळापासून जगाच्या विविध भागांत भूकंपामुळे होणाऱ्या विध्वंसाच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे पृथ्वीच्या आत कुठेतरी व्यापक उलथापालथ होण्याची भीती व्यक्त होत आहे. नेपाळ त्याचं केंद्र ठरणार नाही ना?

अलीकडील काळात नेपाळ आणि हिंदुस्थानच्या उत्तरेकडील प्रांतात सतत भूकंपाचे धक्के बसत असल्याने भूगर्भशास्त्रज्ञांत चिंतेचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी नेपाळला 5.6 रिश्टर स्केल एवढय़ा तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. 3 नोव्हेंबर रोजी आलेल्या भूकंपाने दीडशेहून अधिक जणांचा मृत्यू झाला, तर शेकडो जखमी झाले. हिमालयाच्या पायथ्याशी आणि लगतच्या परिसरात सतत भूकंप होण्यामागे निसर्गावरचे आाढमण हे प्रमुख कारण आहे. याचा संबंध चीनशीही आहे. चीनने या गोष्टींचा विचार न करता तिबेटमध्ये प्रचंड विकासकामे सुरू केली आहेत. हा भाग

इंडोऑस्ट्रेलियन टेटॉनिक प्लेटवर असून तो भूकंपाच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील मानला जातो.

या भूकंपाचा केंद्रबिंदू उत्तर प्रदेशातील अयोध्येपासून 233 किलोमीटर अंतरावर उत्तरेकडे होता. नेपाळची भौगोलिक स्थिती पाहता तेथील भूकंप हे हिंदुस्थानलाही हादरे देणारे आहेत. या भूकंपावरून सध्या बऱ्याच शंकाकुशंका घेतल्या जात आहेत. 3 नोव्हेंबरला नेपाळला रिश्टर स्केलवर 6.4 एवढय़ा तीव्रतेचा भूकंप झाला. हा भूकंप मुख्य होता आणि त्यानंतर बसणारे धक्के त्याचे परिणाम होते का? असा प्रश्नही विचारला जात आहे. वास्तविक भूकंपाचा अचूक अंदाज बांधणारे शास्त्र अद्याप विकसित झालेले नाही. दुर्दैवाने जाजरकोट येथे मनुष्यहानी अधिक झाली आणि त्यामुळे नेपाळमध्ये काळजीचे वातावरण आहे.

नेपाळ मधील लोकांच्या मनात 2015 रोजीच्या भूकंपाची धास्ती आहे. त्या काळात 9 हजार जणांचा मृत्यू झाला होता. तेव्हा अनेक ऐतिहासिक स्थळांची पडझड झाली. दुर्मीळ वारसा नष्ट झाला होता. दहा लाखांपेक्षा अधिक घरांची हानी झाली. त्या वेळी नेपाळला सुमारे 6 अब्ज डॉलरचे नुकसान सहन करावे लागले. यावेळीदेखील बरेच नुकसान झाले असून त्याचा अंदाज बांधणे कठीण आहे.

जगभरात नैसर्गिक आपत्तींच्या घटनांत दरवर्षी सरसरी 20 कोटींपेक्षा अधिक लोकांना फटका बसतो आणि दोन कोटी नागरिक बेघर होतात. दक्षिण आशियातील देशांनी तर अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे. कारण हिमालयाच्या पायथ्याशी असणारा संपूर्ण भाग हा भूकंपाच्या दृष्टीने संवेदनशील आहे. त्यासाठी अशा भागात येणाऱ्या नैसर्गिक संकटापासून बचाव करण्यासाठी वेगळी व्यवस्था करणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. ही व्यवस्था जागतिक व्यासपीठावर एकत्र येऊन करता येणे शय आहे. आपत्तीच्या काळात दक्षिण आशियातील देश एकमेकांना मदत करतील, माहितीचे आदान-प्रदान करतील, मदत सामग्री प्रदान करतील यासाठी सर्वसमावेशक व्यवस्था आणि आराखडा तयार करणे गरजेचे आहे. या काळात सहकार्य करताना आपापसातील वाद बाजूला ठेवणे गरजेचे आहे. अशा संकटापासून बाहेर पडण्यासाठी दक्षिण आशियातील देशांना आर्थिक सुधारणा या परस्पर आणि चांगल्या समन्वयातून कराव्या लागतील. या देशांत चांगले संबंध असणे गरजेचे आहे. अर्थात सतत बसणारे भूकंपाचे धक्के हे एखाद्या इशाऱ्यापेक्षा कमी नाहीत हे ध्यानात घेतले पाहिजे.

भूगर्भातील परिस्थिती चिंताजनक असताना नेपाळ आजही मोठय़ा नैसर्गिक संकटाचा सामना करण्यास सक्षम नाही. 2015 चा भूकंप आणि 2021 मध्ये मेलम्ची पूर यांसारख्या घटनांतून नेपाळ काहीच शिकला नाही. इंडो-ऑस्ट्रेलिया टेक्टोनेट प्लेट यात ऑस्टेलिया उपखंड, हिंदुस्थानी उपखंड आणि लगतच्या महासागराचा समावेश आहे. हा भाग दिवसेंदिवस धोकादायक होत आहे. ही प्लेट युरेशियाकडे सरकत आहे आणि ती तिबेटला वरच्या दिशेने ढकलत आहे. हिमालय तर दरवर्षी सरासरी दोन सेंटिमीटरने वाढत आहे. ‘यूएस जिओलॉजिकल सर्व्हे’च्या एका अहवालात म्हटले की, ल्हासापासून 50 किलोमीटर अंतरावर उत्तरेत शास्त्रज्ञांना चुंबकीय खनिज (मॅग्नाईट) कणांनी युक्त गुलाबी वाळूने तयार झालेल्या दगडांचे थर आढळून आले. या शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या फ्लिप फ्लॉपिंग चुंबकीय क्षेत्राच्या पॅटर्नचीदेखील या वेळी नोंद केली. या अभ्यासातून एक बाब कळते की, जिवाश्म, जीवजंतू सुमारे 10.5 कोटी वर्षांपूर्वी अपेक्षेपेक्षा हलक्या, ओल्या वातावरणात राहत असावेत. त्या वेळी तिबेट हे भूमध्य रेषेजवळ होते. आज तिबेटमधील हवामान अधिक कोरडे असून ते सुमारे 2 हजार किलोमीटर उत्तरेकडे होणाऱ्या बदलांना चिन्हांकित करणारे आहे. वाळूच्या दगडातील थरात आढळून आलेले जिवाश्माचे अवशेष हे गेल्या दहा कोटी वर्षांत प्लेट सरकणे आणि तिबेट भागातील हवामान बदलाचे पुरावे सांगतात. छिंगहाई-तिबेट पठारच्या परिक्षेत्रात हिमालय पर्वतरांगा ते लडाखचा भाग येतो.

तथापि, तिबेटवर दावा करणाऱ्या चीनच्या शासकांना वाटते, की, अशा अभ्यासांना काही अर्थ नाही. ‘वन बेल्ट वन रोड’ या महत्त्वाकांक्षेत अडकलेल्या चीनने ज्या रीतीने तिबेटचे शहरीकरण केले ते पाहता हा भाग त्यांनी संकटाच्या तोंडाजवळ आणून ठेवला आहे, असेच म्हणावे लागेल. तिबेटमध्ये बदल वेगाने झाला आणि म्हणूनच नैसर्गिक संकटाच्या क्षेत्रात हिमालय पर्वतरांगादेखील आल्या. तिबेटमधील दुर्गम भागातील गाव आता महानगराला जोडला गेला आहे. इंडो-ऑस्ट्रेलियन टेक्टोनिक प्लेटवर उभारण्यात आलेल्या बहुमजली इमारती, रॅपिड रेल्वे, कारखाने, रस्ते बांधणी या चीनच्या विकासाची यशोगाथा सांगत असल्या तरी त्या संकटाला निमंत्रण देणाऱ्या आहेत. एक प्रकारे विकासाचा तो भयावह चेहरा आहे. या आघाडीवर चीनला विरोध करण्याची शक्ती नेपाळमध्ये नसेलही, परंतु हिंदुस्थानने धाडस दाखवले पाहजे. या गोष्टी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर गांभीर्याने मांडायला हव्यात.

‘पोस्ट डिझास्टर नीड्स असेसमेंट’ अहवालानुसार, नेपाळ हा भूकंपाच्या बाबतीत जगातील 11 वा सर्वात धोकादायक देश आहे. पश्चिम नेपाळमध्ये  आलेला ताजा भूकंप 2023 मध्ये होणाऱ्या 70 भूकंपांपैकी एक आहे. नेपाळमधील राष्ट्रीय भूकंप निरीक्षण आणि संशोधन केंद्राचे वरिष्ठ भूकंपशास्त्रज्ञ भरत कोईराला यांच्या म्हणण्यानुसार, हिंदुस्थानी आणि युरेशिया टेक्टोनिक प्लेट्समध्ये सतत टक्कर होत असते, ज्यामुळे भरपूर ऊर्जा निर्माण होते. नेपाळ या दोन प्लेट्सच्या सीमेवर असल्याने भूकंपांच्या दृष्टीने अतिािढयाशील भागात आहे. त्यामुळे पश्चिम नेपाळमध्ये मोठय़ा भूकंपाचा धोका आहे. गेल्या 520 वर्षांपासून पश्चिम नेपाळमध्ये मोठा भूकंप झालेला नाही. त्यामुळे भरपूर ऊर्जा जमा झाली आहे आणि ती ऊर्जा सोडण्यासाठी भूकंप हे एकमेव माध्यम आहे.  पश्चिम नेपाळमधील गोरखा (जिल्हा) ते हिंदुस्थानातील देहराडूनपर्यंत टेक्टोनिक हालचालींमुळे बरीच ऊर्जा जमा झाली आहे. ती बाहेर पडण्यासाठी या भागात छोटे किंवा मोठे भूकंप होत आहेत.

(लेखिका पर्यावरणतज्ञ आहेत.)