प्रशासन आणि मनुष्यबळ पुरवठा कंत्राटदार यांनी कंत्राटी कामगारांचा आजवरचा लाटलेला पगार जोवर कामगारांच्या बॅंक खात्यात येत नाही, तोवर स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार कायद्याने वागा लोकचळवळीच्या लेबर राईटस् चे रत्नागिरी समन्वयक विजयकुमार जैन यांनी व्यक्त केला आहे. या विषयावर जो पर्यंत रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी आपली भूमिका स्पष्ट करत नाहीत, तो पर्यंत गप्प बसणार नाही , असा इशारा जैन यांनी दिला आहे.
जानेवारी, 2024 पासून कंत्राटी कामगारांच्या शोषणाविरोधात लेबर राईटस् सातत्याने पत्रव्यवहार करीत आहे, परंतु जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा दिल्याबरोबर लगेच प्रशासनाने मनुष्यबळ पुरवठ्याच्या निविदेत सुधारणा केल्याचा दावा करीत यापुढे कामगारांना नियमकायद्यानुसार वेतन मिळेल, अशा आशयाचे पत्र जैन यांना दिले. नियोजित उपोषण मागे घेण्याची विनंती सदर पत्रातून मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी जैन यांना केली आहे. मात्र, सदरच्या पत्राने जैन यांचे समाधान झालेले नाही. कायद्याने वागा लोकचळवळीचे संस्थापक राज असरोंडकर हे स्वत: रत्नागिरीत येऊन लवकरच बेमुदत उपोषण करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
एका कामगाराचे 10 हजार असे 250कामगारांच्या पगारातले दरमहा 25 लाख रुपये लाटले गेले आहेत. कामगारांचे अंदाजित 10 कोटी रुपये त्यांना परत मिळवून द्यायचे आहेत. हा त्यांच्या कष्टाचा पैसा आहे. हा पैसा मुख्य नियोक्ता या नात्याने नगरपरिषदेने चुकता करायचा आहे. तो त्यांनी कंत्राटदाराकडून वसूल करून द्यावा किंवा स्वत:च्या तिजोरीतून द्यावा, पण द्यावा लागणारच ! असं ठाम प्रतिपादन करत जैन म्हणाले की इथे नुसतं कामगारांचं शोषण नाही, तर तितक्याच रक्कमेचा हा भ्रष्टाचारही आहे. त्यामुळे कामगारांना परतफेड नाही मिळाली तर कंत्राटदार आणि प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना तुरुंगात जाण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही असे विजयकुमार जैन यांनी सांगितले.