आम्हाला कानपूरला बाय रोड नको हो… विमानाने न्या, विकास दुबेच्या हस्तकांची टरकली

1370

कुख्यात गॅगस्टर विकास दुबे याच्या एन्काऊंटरनंतर त्याच्या हस्तकांची साफ टरकली आहे. आम्हाला बाय रोड कानपूरला नेऊ नका, विमानाने घेऊन जा, अशी विनवणीच शनिवारी ठाण्यात मुसक्या आवळलेल्या विकासचे साथीदार गुड्ड्न त्रिवेदी आणि सोनू तिवारी यांनी ठाण्याच्या विशेष सत्र न्यायालयाकडे केली. विकासप्रमाणेच आपलेही एन्कांऊटर होईल या भीतीने दोघांचीही वकिलांमार्फत लेखी अर्जाद्वारे ही मागणी केली आहे. या दोघांना 21 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

उत्तर प्रदेशातील मोस्ट वॉण्टेड गुंड विकास दुबे पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत शुक्रवारी ठार झाला. त्याने व त्याच्या हस्तकांनी कानपूर येथील बिकरू गावात आठ पोलीस अधिकारी व कर्मचाऱयांचे हत्याकांड केले होते. तेव्हापासूनच दुबेचे साथीदार अरविद उर्फ गुड्डन त्रिवेदी (46) आणि त्याचा ड्रायव्हर सुशीलकुमार उर्फ सोनू तिवारी (30) हे फरार होते. त्यांना एटीएस प्रमुख देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली एटीएसच्या जुहू युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक यांनी ठाण्याच्या कोलशेत परिसरातून शनिवारी अटक केली होती. मात्र आज त्यांना ठाण्याच्या विशेष सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश रश्मी झा यांनी 21 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि विकास दुबेच्या एन्काऊंटरने या दोन्ही हस्तकांची पाचावर धारण बसली आहे. त्यामुळे दोघांना गाडीतून कानपूर येथे घेऊन न जाता हवाईमार्गे लखनऊ एअरपोर्टला नेण्यात यावे, अशी मागणी आरोपींचे वकील अनिल जाधव यांनी ठाणे न्यायालयात लेखी अर्जाद्वारे केली आहे.

…तोपर्यंत तळोजा कारागृहात रवानगी
उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये झालेल्या आठ पोलीस कर्मचाऱयांच्या हत्या प्रकरणातील हे वॉण्टेड आरोपी आहेत. त्यांच्यावर उत्तर प्रदेशात गुन्हा दाखल असल्याने त्यांना महाराष्ट्र एटीएस यूपी पोलिसांच्या स्वाधीन करणार आहे. मात्र उत्तर प्रदेश पोलिसांचे पथक येईपर्यंत आरोपींना तळोजा कारागृहात ठेवले जाईल. त्यानुसारच आज ठाणे न्यायालयाने दोघा आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या