अखेर विकास दुबेच्या मुसक्या आवळल्या

383

कानपूर येथे 8 पोलिसांच्या हत्येप्रकरणी गेल्या आठवडाभरापासून फरार असलेला विकास दुबेला अखेर मध्य प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. मध्य प्रदेश उज्जैन येथील महाकाल मंदिरात दर्शनासाठी आला असताना पोलिसांनी ही कारवाई केली. अनेक नाट्यमय घडामोडीनंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. दरम्यान, कानपूर येथून फरार झालेला विकास उज्जैनपर्यंत पोहचला कसा याचा तपास पोलीस करत आहेत. तर पोलीस एन्काऊंटर टाळण्यासाठीच तो अशाप्रकारे समोर आल्याचे म्हटले जात आहे.

कानपूर येथील बिकरु येथील गावांत विकास दुबे याला अटक करायला गेलेल्या ८ पोलिसांची हत्या केल्यानंतर विकास दुबे फरार झाला होता. गेल्या आठवडाभरापासून तो पोलिसांना चकवत होता. पोलिसांनी त्याच्यावर पाच लाखांचे बक्षीस देखील जाहीर केले होते. अखेर आज मध्य प्रदेश येथील उज्जैन येथील महाकाल मंदिरात दर्शनासाठी आले असता पोलिसांनी त्याला अटक केली. दुबे मंदिरात आल्यानंतरच तेथील सुरक्षा रक्षकांना संशय आला होता. त्याने तेथील एका दुकानातून पूजेचे सामान घेतले. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी पोलिसांना दुबेची माहिती दिली. मंदिरातून बाहेर आल्यानंतर दुबेची रक्षकांबरोबर त्याची बाचाबाची झाली. मात्र अनेक नाट्यमय घडामोडीनंतर त्याला अटक केली.

२५० रुपयांच्या पावतीने केला घात
गेल्या आठवडाभरापासून फरार असलेला विकास दुबे हा आज मध्य प्रदेश येथे अचानक प्रकटला. उज्जैन येथील महाकाल मंदिरात व्हीआयपी दर्शनासाठी त्याने २५० रुपयांच्या पावतीवर आपले खरं नाव लिहले. या पावतीनेच त्याचा घात केल्याचे समजते. पावतीवरील नाव लक्षात येताच सुरक्षा रक्षकांनी त्याच्यावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आणि पुढील माहिती पोलिसांना दिली.

पकडल्यानंतर दुबेची आरडाओरड
मध्य प्रदेश पोलीस विकास दुबेला अटक करण्यासाठी आले असता, दुबेने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यासंदर्भातील एक व्हिडीओदेखील व्हायरल झाला आहे. मैं ही विकास दुबे हूँ कानपूरवाला, असे तो या व्हिडीओत ओरडत असताना दिसून येत आहे. त्यावेळी उपस्थित पोलीस कर्मचाऱ्याने त्याच्या कानशिलात देखील लगाविली. मध्य प्रदेश पोलिसांनी तब्बल २ तास त्यांची चौकशी केली आणि त्यानंतर त्याला अटक केली.

आपली प्रतिक्रिया द्या