विकास दुबे एन्काऊंटरवर काँग्रेसचे योगी सरकारला 11 सवाल; अखिलेश म्हणतात, ‘…तर सरकार पडले असते’

4989

उत्तर प्रदेशमधील कानपुर येथे 8 पोलिसांच्या हत्येतील आरोपी विकास दुबे शुक्रवारी पोलिसांच्या चकमकीत मारला गेला. मध्य प्रदेशमधील उज्जैन येथील महाकाल मंदिर परिसरात अटक करण्यात आल्याचा 24 तासात त्याचा एन्काऊंटर झाला. यामुळे पोलीस आणि उत्तर प्रदेश सरकारवर विरोधकांनी प्रश्नांची सरबत्ती केली आहे.

विकास दुबे याला घेऊन जाणारी गाडी अपघातग्रस्त झाली आणि यात 4 पोलीस जखमी झाले. याच दरम्यान विकास दुबे याने पोलिसांची रिव्हॉल्व्हर हिसकावून घेतली आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने गोळीबार केला आणि प्रत्युत्तरा दाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात विकास मारला गेला, अशी माहिती पोलिसांनी दिली. मात्र यावर राजकारण सुरू झाले असून समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी ‘विकास जिवंत राहिला असता तर योगी सरकार पडले असते’, असे ‘आज तक’शी बोलताना म्हटले.

काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी देखील पत्रकार परिषदेत योगी सरकारवर हल्लाबोल केला. योगी सरकारच्या काळात राज्यात गुन्हेगारी फोफावली गेल्याचे त्यांनी म्हटले. तसेच 11 सवालही उपस्थित केले आहेत.

1. विकास दुबे सत्तेत बसलेल्या लोकांचा मोहरा होता? सत्तेत बसलेल्या लोकांकडून त्याला संर7 मिळत होते?

2. विकास दुबेचे रहस्य कोण लपवत आहे?

3. विकास दुबे याचे नाव 25 मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांच्या यादीत समाविष्ट करण्यात का आले नव्हते?

4. जर त्याला पळायचे होते तर उज्जैनला जाऊन त्याने आत्मसमर्पण का केलं?

5. प्रसारमाध्यमांना एन्काऊंटर स्थळावर जाण्यापासून का रोखण्यात आले?

6. विकास दुबे याला हवाइमार्गाने आणले जाणार होते मात्र नंतर त्यात बदल का केला गेला?

7. अपघात होण्यापूर्वी विकास दुबे सफारी गाडीत दिसत होता. मात्र दुसऱ्याच गाडीचा अपघात झाला आणि आता वेगळेच सांगितले का जात आहे?

8. विकासच्या पायात लोखंडी रॉड असताना तो पळू कसा शकत होता?

9. तो जर पळत होता तर गोळी छातीत कशी लागली?

10. घटनास्थळी गाडी घसरल्याने कोणत्याही खाणाखुणा का दिसत नाहीये?

11. विकास दुबे जर पळत होता तर त्याचे कपडे सुकलेले कसे, चिखलाचे काहीही निशाण कसे नाही?

दरम्यान, विकास दुबे याचे एन्काऊंटर म्हणजे ‘सत्याचे एन्काऊंटर’ आहे. याद्वारे सत्य लपवले जात आहे असेही सुरजेवाला म्हणाले. तसेच विकास याच्या पाठीमागे असलेल्या चेहऱ्यांना सार्वजनिक करणे हीच कानपुर शहिदांच्या आत्म्याला श्रद्धांजली ठरेल, असेही ते म्हणाले.

राहुल गांधी, प्रियांका गांधी यांनी साधला निशाणा

आपली प्रतिक्रिया द्या