‘चांदोबा’, ‘विक्रम-वेताळ’चे चित्रकार शिवशंकर यांचे निधन

लहान मुलांचे प्रसिद्ध मासिक ‘चांदोबा’ (चंदामामा)चे चित्रकार के. सी. शिवशंकर ऊर्फ चंदामामा शंकर यांचे मंगळवारी निधन झाले. ते 97 वर्षांचे होते. तामिळनाडू येथील तिरुपुरमधील घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चांदोबा मासिकामधील विक्रम-वेताळच्या कथांमधील विक्रम आणि वेताळ या पात्रांना त्यांनी रेखाटले होते. पुढे कित्येक दशके या पात्रांचे वाचकांवर गारुड राहिले.

शिवशंकर यांचा जन्म तामिळनाडूमधील एरोडजवळील गावचा. त्यांचे वडील शिक्षक होते. बी. नागी रेड्डी आणि चक्रपाणी यांनी ‘चंदामामा’ मासिकाची सुरुवात केली होती. सुरुवातीला हे मासिक तेलुगुमधून प्रकाशित होत असे. 1947 साली या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला होता. 2013 साली हे मासिक बंद करण्यात आले. ‘चांदोबा’ मासिकाच्या मूळ डिझाईन टीममधील ते अखेरचे जिवंत सदस्य होते. विक्रम-वेताळचे चित्र त्यांनी 1960 मध्ये रेखाटले होते. ते चित्र आणि खाली त्यांची सही हे ‘चांदोबा’ वाचणाऱया सर्वांच्या कायम स्मरणात राहील.

आपली प्रतिक्रिया द्या