
राष्ट्रीय पुरस्कार विजेते रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. तुझ्यासारखा कलावंत या मातीत घडला हे आमचे भाग्य असून लेखकांनी आणि दिग्दर्शकांनी कल्पनेत पाहिलेल्या व्यक्तिरेखांना तू तुझे खरे ‘रंग’ दिलेस, अशा शब्दांत अभिनेता सुबोध भावे याने विक्रम गायकवाड यांना श्रद्धांजली वाहिली.
अभिनेता सुबोध भावेने विक्रम गायकवाड यांचा पह्टो शेअर करत लिहिले, ‘विक्रम दादा तुला भावपूर्ण श्रद्धांजली. तुझ्यासारखा कलावंत या मातीत घडला हे आमचे भाग्य. कितीतरी कलाकारांच्या आयुष्यात तू आशीर्वाद म्हणून आलास आणि त्यांना त्यांच्या भूमिकेला भिडण्याचे धैर्य दिले. लेखकांनी आणि दिग्दर्शकांनी कल्पनेत पाहिलेल्या व्यक्तिरेखांना तू तुझे खरे ‘रंग’ दिले. माझ्या आयुष्यात ‘बालगंधर्व’, ‘लोकमान्य’, ‘कटय़ार काळजात घुसली’ आणि ‘डॉ. काशीनाथ घाणेकर’ आणि ‘तुला पाहते रे’ या सर्व कलापृतींमध्ये तुझे योगदान अभूतपूर्व आहे. तुझ्याशिवाय या भूमिकांचा विचारही मी करू शकत नाही. तुझ्यासारखा कलावंत आमच्या आयुष्यात आला आणि आम्हाला समृद्ध करून गेला. माझ्यासाठी तू कायमच जिवंत आहेस. खूप मनापासून प्रेम आणि तुला वंदन विक्रम दादा. ओम शांती’, अशा शब्दांत सुबोध भावे याने श्रद्धांजली वाहिली.