
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. ते उपचारांना प्रतिसाद देत असून त्यांनी डोळे उघडले आहेत. तसेच हातापायांची हालचालही केल्याची माहिती रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
अभिनेते विक्रम गोखले यांच्यावर पंधरा दिवसापासून पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र दोन दिवसांपूर्वी विक्रम गोखले यांची तब्येत खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले होते. त्यातच त्यांच्या तब्येतीबाबत उलटसुलट चर्चा सुरु होत्या. मात्र शिरीष याडगीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रम गोखले यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. ते उपचारांना प्रतिसाद देत असून त्यांनी डोळे उघडले आहेत. तसेच हातापायांची हालचालही केली आहे. त्यामुळे पुढच्या 48 तासात त्यांचे व्हेंटिलेटर काढण्यात येईल. त्यांचा रक्तदाब आणि हृदयाची क्रिया स्थिर असल्याची माहिती दिली आहे.



























































