रस्त्याच्या निकृष्ट कामावरून ग्रामस्थ संतापले, करोडी येथे ‘रास्ता रोको’; प्रशासनाचा निषेध

तालुक्यातील करोडी ते टाकळी मानूर या रस्त्याचे चालू असलेले काम निकृष्ट दर्जाचे असून, हे काम करणाऱया ठेकेदारावर कारवाई करून रस्ता कामाचे ऑडिट करावे, यासाठी करोडी येथे नागरिकांनी ‘रास्ता रोको’ आंदोलन केले.

करोडी ते टाकळी मानूर या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळूनही काम सुरू होत नव्हते. ग्रामस्थांनी ‘रास्ता रोको’ आंदोलन केल्यानंतर काम सुरू झाले. मात्र, हे काम दर्जेदार पद्धतीने होत नसल्याचा आरोप करत आज गहिनीनाथ शिरसाठ, योगेश गोल्हार, शुभम गांधी, किसन आव्हाड, अशोक गोल्हार, शिवनाथ वारे, उत्तम खेडकर, पांडुरंग खेडकर, भगवान खेडकर, उद्धव खेडकर, माणिक खेडकर, पोपट खेडकर यांनी करोडी येथे ‘रास्ता रोको’ आंदोलन सुरू केले.

गहिनीनाथ शिरसाठ म्हणाले, रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे, यासाठी आंदोलन करावे लागते, हे दुर्दैव आहे. जो ठेकेदार रस्त्याचे काम करत आहे तो सत्तेचा गैरवापर करून व अधिकाऱयांवर दबाव आणून निकृष्ट दर्जाचे व मनमानी पद्धतीने काम करत आहे. या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कारवाई व्हायला हवी. आठ कोटी रुपये खर्चाचे हे काम असले तरीही मूळ अंदाजपत्रकाप्रमाणे काम केले जात नाही. कामावर देखरेख करण्यासाठी शासनाचा अभियंता या ठिकाणी कधीही उपस्थित राहत नाही. या कामाचे सोशल ऑडिट करून निकृष्ट झालेले काम पुन्हा नव्याने करण्यात यावे. ठेकेदारावर आणि संबंधित अभियंत्यावर दंडात्मक कारवाई करावी. चौकशी पूर्ण होईपर्यंत बिल अदा करण्यात येऊ नये, अशी मागणी शिरसाठ यांनी केली.

या आंदोलनाला ‘पंतप्रधान ग्रामसडक योजने’चे अधिकारी सामोरे गेले व त्यांनी निकृष्ट झालेले काम पुन्हा करून घेतले जाईल. कोणालाही आम्ही पाठीशी घालणार नाही, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन विसर्जित करण्यात आले.