रुग्णालयात बेड मिळत नसल्याने … गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून गावातच उभारले कोविड सेंटर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण दिवसेंदिवस वाढत आहे. औषधांबरोबरच रुग्णालयात बेड मिळणे अवघड झाले आहे. या परिस्थितीत रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून नागपूर जिल्ह्यातील ‘कढोली’च्या गावकऱयांनी लोकवर्गणीतून गावातच कोविड केअर सेंटर उभारत ग्रामस्थांची सोय केली आहे.

नागपूर-भंडारा रस्त्यावर कामठी तालुक्यात कढोली हे गाव आहे. पाच हजार लोकवस्तीच्या या गावातील ग्रामस्थ नकारात्मक विचार बाजूला ठेवत एकीच्या बळावर कोरोनाविरोधात लढा देत आहेत. कोरोनाच्या दुसऱया लाटेत वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णांना बेड मिळत नाही,  इंजेक्शनसाठी वाटेल ती किंमत मोजावी लागत आहे. ही वेळ आपल्या गावावर येऊ नये यासाठी कढोली गावच्या ग्रामस्थांनी पुढाकार घेत आपल्या गावात 20 खाटांचे कोविड सेंटर उभारले. यामध्ये ऑक्सिजनचीही सोय आहे. आतापर्यंत गावातील 16 रुग्णांवर येथे मोफत उपचार करण्यात आले आहेत.

  • प्राथमिक आरोग्य केंद्रातील एक डॉक्टर दररोज कोविड सेंटरला भेट देऊन रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करेल असे नियोजन येथे करण्यात आले आहे.
  • कढोली गावातील 70 टक्के लोक गावाबाहेर कंपन्यांत कामाला जात असल्याने त्यांचा इतरांशी संपर्क येतो. त्यामुळे गावकऱयांची नियमित तपासणी करण्यावर भर देण्यात येत आहे.
  • ज्येष्ठ नागरिक तसेच 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी गावात तीन लसीकरण शिबिरे घेतली. गावातील 90 टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

तासाभरात 70 हजारांचा निधी जमा

कोविड सेंटर उभारण्यासाठी लोकवर्गणीचे आवाहन केल्यानंतर तासाभरात 70 हजार रुपयांचा निधी ग्रामस्थांनी जमा केला. या निधीतून 20 खाटा आणि तीन ऑक्सिजन सिलिंडर खरेदी केले. गावातील एखाद्या व्यक्तीस कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्यास तत्काळ कोविड सेंटरमध्ये दाखल केले जाते.

नकारात्मक पोस्टवर बंदी

कोरोना महामारीत नकारात्मक दृष्टिकोन ठेवण्यापेक्षा सकारात्मक विचार जास्तीत लोकांपर्यंत पोहचवून कोरोनाविषयक समाजात जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. गावातील लोकांचा स्वतंत्र व्हॉट्सअॅप ग्रुप व स्वतŠच फेसबुक पेज तयार करून गावकऱयांचे प्रबोधन केले. कोरोनासंदर्भात नकारात्मक पोस्ट टाकण्यावर बंदी केली.